गडचिरोली : स्थानिक गांधी वॉर्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. गांधी वॉर्डात दाट लोकवस्ती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाल्या आहेत.
ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक
आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दुग्ध संस्थांना आर्थिक मदतीची मागणी
गडचिरोली : अपुऱ्या दूधपुरवठ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ६० पेक्षा अधिक दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दूध उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र, शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दूध उत्पादनाला बराच वाव असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा पुरवा
देसाईगंज : ऑनलाइन सातबारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ग्रामीण भागात वीज व इंटरनेटची समस्या सतत जाणवत असते. त्यामुळे हस्तलिखित सातबारा पुरवावा, अशी मागणी होत आहे.
आरमोरीत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक मुत्रीघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मुत्रीघर तयार केली आहेत. त्यामुळे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे.
बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची मागणी
आष्टी : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक असून, जास्तीत जास्त टॉवर उभारण्याची मागणी होत आहे.
शौचालयांची स्वच्छता करा
देसाईगंज : शासकीय कार्यालयांच्या शौचालयात फार मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. सदर शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
चामोर्शीत कुशल मजुरांचा तुटवडा
चामोर्शी : विविध कुशल कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. मात्र, कुशल मजुरांची कमतरता आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी कुशल कामगारांचा तुटवडा जाणवतो.
पाणी टाकी परिसरातील सुरक्षा वाऱ्यावर
गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे; परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे.
प्राचीन महादेवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा द्या
आरमोरी : पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आरमोरी येथील प्राचीन महादेवगड आजही उपेक्षितच आहे. राज्य शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे; परंतु आरमोरी येथील प्राचीन महादेवगडाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला नाही.
खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करा
गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.
विनापरवानगीने घरांचे बांधकाम
गडचिरोली : शहरात नगर परिषद प्रशासनाची परवानगी न घेताच दर वर्षी शेकडो घरे बांधली जात आहेत. या घरांवर नगर परिषद कोणतीही कारवाई करीत नसल्याने दरवर्षी विनापरवानगीने बांधणाऱ्या घरांची संख्या शहरात वाढत चालली आहे.
सुसाट दुचाकीधारकांवर कारवाई करा
अहेरी : दुचाकीच्या कर्कश आवाजामुळे शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाहन चालवीत असल्याने वाहनांचा कर्कश आवाज ऐकावा लागत आहे.