कुरखेडा : रामगड-पुराडा भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात तत्काळ डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. नियमित फवारणीकरिता वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
वाहनांवर कारवाई करा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
गॅस सिलिंडर योजनेचा बट्ट्याबोळ
आरमोरी : वन विभागामार्फत नागरिकांना तसेच वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र संपल्यानंतर सिलिंडर भरण्यासाठी लांब अंतराच्या गावांकडे जावे लागते. गॅस सिलिंडर रिफिलिंगच्या ठिकाणाचे योग्य नियोजन नसल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागातील गोदरीमुक्तीवर प्रश्नचिन्ह
विसोरा : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे, मात्र ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी शौचालय बेकामी झाले आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हागणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. अनेक जण बाहेर जाऊन शाैचविधी आटाेपत आहेत.
ग्रामीण भागात पेट्रोलची अवैध विक्री सुरूच
गडचिरोली : ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजूंकडून एका लीटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.
स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. शेवटचा प्रवास अडचणीचा ठरत आहे.
जलद बसचा थांबा द्या
आरमोरी : देऊळगाव येथून अनेक विद्यार्थी आरमोरी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. शिवाय सिर्सी, इंजेवारी येथील नागरिकही देऊळगाव बसथांब्यावर येऊन बसची प्रतीक्षा करतात. त्यामुळे देऊळगाव येथे जलद बसचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी आहे. दुर्गम भागात अद्यापही महामंडळाच्या बसफेऱ्या सुरू नाहीत.
कुत्र्यांचा बंदोबस्त करा
एटापल्ली : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर पंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेक वेळा नगर पंचायतीकडे केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. बंदाेबस्त करण्याची मागणी आहे.
अनेक शाळा विजेविनाच
कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळ खात पडून आहे. काही शाळांना वीजपुरवठा होता. मात्र वीजबिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत.
अल्पवयीनांकडे दुर्लक्ष
गडचिरोली : शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन वाहनधारकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र याकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस केवळ चारचाकी वाहनांवर अधिक कारवाई करीत असल्याचे दिसून येत आहे.
बायोगॅससाठी अनुदान द्या
गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास या कुटुंबांना बिनाखर्ची गॅसची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याऐवजी बायोगॅससाठी अनुदान देण्याची मागणी आहे.
सभागृहाच्या मागे घाण
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहाच्या मागील परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून याकडे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील दुकानदार याच ठिकाणी लघुशंकेसाठी जातात व दुकानातील कचराही टाकतात. त्यामुळे परिसरातील लाेकांना त्रास हाेताे.
मंद इंटरनेटचा त्रास
कुरूड : परिसरात बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा देण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.
जनावरांमुळे रहदारी बाधित
एटापल्ली : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभी राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.