कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरमोरी शहरात मोठ्या प्रमाणात पाय पसरले आहेत. कोरोनाच्या संसर्गाने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे लोकांमध्ये कोरोनाची भीती वाटू लागली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या नगरपंचायत व नगरपरिषदेने आपापल्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करून शहराचे निर्जंतुकीकरण करीत आहेत. मात्र देसाईगंज शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नगरपरिषद प्रशासन मात्र शांत आहे. नगरपरिषदेने शहरातील कोरोना रुग्ण सापडलेल्या घराचे निर्जंतुकीकरण करणे सुरू केले असले तरी कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी सार्वजनिकरीत्या संपूर्ण प्रभागाची जंतुनाशक फवारणी केली नाही.
शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना होताना दिसत नाही. पाहिजे त्या प्रमाणात साफसफाई केल्या जात नाही. अनेक ठिकाणी नाल्या भरलेल्या आहेत. त्याचा उपसाही बरोबर केला जात नाही. शहरातील हॅण्डवॉशसुद्धा बंद पडलेले आहेत. कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत नगरपरिषद फारसे गंभीर दिसत नाही.
(कोट)
शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने शहरात आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना कराव्यात व शहरातील प्रत्येक प्रभागात जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी मी यापूर्वीच मुख्याधिकारी यांना भेटून केली आहे. नगरपरिषद प्रशासनाने नगरपरिषद क्षेत्रात तात्काळ फवारणी करावी.
मिलिंद खोब्रागडे,
नगरसेवक आरमोरी
(कोट)
आरमोरी शहराची फवारणी करून प्रत्येक वाॅर्ड निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तत्काळ नगरपरिषद प्रशासनाने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी आपणही नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
पंकज खरवडे,
तालुकाध्यक्ष भाजयुमो, आरमोरी