केरोसीनचा काळाबाजार वाढला
गडचिरोली : गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह जिल्हाभरातील ग्रामीण भागात केरोसीनचा काळाबाजार सुरू आहे. गरीब, सर्वसामान्य कुटुंबांना केरोसीन मिळण्याऐवजी ट्रक मालकांना केरोसीन दिले जात आहे. गरिबांना केरोसीन वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांची अडचण झाली आहे.
अनेक गावांसाठी लाइनमनच नाही
आरमोरी : तालुक्यातील अनेक गावांत सुरळीत विद्युतपुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाइनमन असणे गरजेचे असते; परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युतपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे लाइनमन द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करा
गडचिरोली : शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. या वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मध संकलनातून राेजगारनिर्मिती शक्य
कमलापूर : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.
घाण पाण्याच्या गटाराने डास वाढले
गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डांत मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याचे डबके तसेच गटारे निर्माण झाली आहेत. या डबक्यांच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील कन्नमवार वॉर्डात अशा प्रकारचे घाण पाण्याची गटारे अनेक ठिकाणी आहेत.
लघू व्यावसायिक आर्थिक संकटात
चामाेर्शी : शहरात शेकडो लघू व्यावसायिक अनेक वर्षांपासून व्यवसाय करून कुटुंब चालवत आहेत. मात्र, कोरोना संकटामुळे यावर्षी त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लघू व्यवसाय करणाऱ्यांची दैनंदिन आवक रोजच्या आर्थिक घडामोडींवर अवलंबून असते. मात्र, कोरोनामुळे सर्व व्यवहार डबाघाईस आले आहेत.
परवाना शिबिराचे आयोजन करावे
काेरची : तालुक्यात दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी ठरावीक दिवशी शिबिर आयोजित केले जाते. मात्र, कोरोनामुळे अशा शिबिराचे आयोजन बंद केले आहे.
जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
आलापल्ली : मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर ही जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा
आष्टी : संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या वतीने अपंग युवक-युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते. मात्र, या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने, अनेक अपंग युवक- युवती योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.
व्यावसायिकांमुळे वाहतुकीला अडथळा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात मुख्य मार्गाच्या कडेला अनेक किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध साहित्य विकत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. गांधी चाैकात सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दुचाकी व हातठेल्यांची गर्दी असते. पालिका प्रशासन कारवाईबाबत सुस्त असल्याचे दिसून येते.
औद्योगिक वसाहती स्थापन करा
गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चामोर्शी, आष्टी, आलापल्ली येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी. या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना ५० टक्के सुट्टीवर वीज, पाणी, जागा व इतर सवलती देण्यात याव्या, अशी मागणी आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
खांब गाडणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी, अपघात होण्याची शक्यता आहे.