कुरखेडा : रामगड-पुराडा भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात तत्काळ डासप्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी डासप्रतिबंधक औषधांची फवारणी करणे आवश्यक हाेते, मात्र दुर्लक्ष झाले. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरात नियमित फवारणीकरिता वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
विविध योजनांबद्दल शेतकरी अनभिज्ञ
देसाईगंज : कृषी, महसूल व वनविभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावामध्ये पोहोचत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती मिळत नाही.
दुग्ध संस्थांना आर्थिक मदतीची मागणी
गडचिरोली : अपुऱ्या दूधपुरवठ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दूध उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र, शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दूध उत्पादनाला बराच वाव असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कमी रेंजमुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त
आष्टी : जयरामपूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा मागील अनेक दिवसांपासून विस्कळीत होत असल्याने या भागातील विविध कंपन्यांच्या भ्रमणध्वनी ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्यांची रेंज वाढवावी, अशी मागणी होत आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. प्रभावी उपाययाेजना करावी.
व्यावसायिकांमुळे वाहतुकीला अडथळा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात मुख्य मार्गाच्या कडेला अनेक किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध साहित्य विकत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. गांधी चाैकात सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दुचाकी व हातठेल्यांची गर्दी असते. पालिका प्रशासन कारवाईबाबत सुस्त असल्याचे दिसून येते.
औद्योगिक वसाहती स्थापन करा
गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चामोर्शी, आष्टी, आलापल्ली येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी. या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना ५० टक्के सुटीवर वीज, पाणी, जागा व इतर सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
खांब गाडणाऱ्यांवर कारवाई करा
आरमाेरी : शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डे खोदतात. नंतर हे खड्डे तसेच ठेवले जातात. परिणामी, अपघात होण्याची शक्यता वाढते.