वैरागड भागाला पुराचा तडाखा : शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटवैरागड : मागील तीन दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे कुरखेडाकडून वैरागडकडे वाहणाऱ्या सती नदीला पूर आला. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील अंकुरलेले भूईमुगाचे पीक पुरात वाहून गेले. परिणामी अनेक शेतकऱ्यांवर भूईमूगाची दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. वैरागडानजीकच्या सती, वैलोचना व खोब्रागडी नदीला पूर आल्यामुळे परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली आल्या. यात धानपिकासह इतर पिके वाहून गेली. अतिवृष्टी व पुराच्या तडाख्याने वैरागड, कढोली परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. आरमोरी तालुक्याच्या वैरागड, कढोली परिसरात अनेक शेतकरी गेल्या पाच-सहा वर्षांपासून नदीकिनाऱ्यावरील आपल्या जमिनीत भूईमूगाची लागवड करीत आहेत. गतवर्षी वैरागड भागात भूईमूगाचे चांगले उत्पादन आले होते. यंदाही भूईमूगाचे उत्पादन घेण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी कंबर कसली. कढोली परिसरातील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी नदी किनाऱ्यावरील जमिनीत भूईमूगाची पेरणी केली. भूईमूगांला अंकूरही फुटले. मात्र शनिवारपासून कुरखेडा, आरमोरी तालुक्यासह जिल्हाभरात संततधार पाऊस बरसला. अतिवृष्टीमुळे पुरात नदी किनाऱ्यावरील अंकुरलेले भूईमूग पीक वाहून गेले. यामुळे कढोली येथील शेतकरी देवानंद आकरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांवर भूईमूग पिकाच्या दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अतिवृष्टीमुळे वैरागड येथील किशोर गेडाम यांच्या घराची पडझड झाली. कढोलीजवळील पुलाच्या एका टोकावर मोठा खड्डा पडल्याने धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वैरागडजवळील कराडी, पाटणवाडा, मेंढा, वडेगाव येथील नदी किनाऱ्याच्या सखल भागातील शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिकांची मोठी हानी झाली आहे. पूरपरिस्थितीमुळे तूर, मका, भाजीपाला पिकालाही फटका बसला. अद्यापही वैरागड, कढोली परिसरातील शेतजमिनीमध्ये प्रचंड ओलावा आहे. पुन्हा पावसाचा जोर कायम असल्याने धान व इतर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महसूल प्रशासनाने तत्काळ या भागातील शेतजमिनीचे सर्वेक्षण करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.शनिवारपासून बुधवारपर्यंत झालेल्या संततधार पावसामुळे वैरागड, कढोली परिसरातील अनेक डांबरी रस्ते उखडले आहेत. तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पूर परिस्थितीमुळे आरमोरी तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (वार्ताहर)भूईमूग हे तेलवर्गीय महत्त्वाचे नगदी पीक आहे. कढोली नदीकाठाची माती चांगल्या निचऱ्याची वाळूमिश्रीत असल्याने येथे भूईमूग पिकाला मोठा वाव आहे. त्यामुळे कढोली परिसरात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक भूईमूगाची लागवड केली जाते. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून भूईमूगाच्या पेरणीस सुरुवात झाली. यंदा आपण आतापर्यंत १ क्विंटल भूईमूगाचा पेरा पूर्ण केला. मात्र अंकुरलेले भूईमूग पुरात वाहून गेल्याने दुबार पेरणीचे संकट आहे.- देवानंद आकरे, शेतकरी, कढोली
अंकुरलेले भूईमूग पीक वाहून गेले
By admin | Published: September 15, 2016 1:54 AM