सिरोंचा (गडचिरोली)- गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथे कार्यरत राज्य राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने आपल्याच रायफलमधून स्वतःवर गोळी चालवून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी 4.45 वाजताच्या सुमारास घडली. एस.एस. चव्हाण असे जखमी जवानाचे नाव असून तो धुळे येथील रहिवासी आहे.
नक्षलविरोधी अभियानासाठी एसआरपीएफची एक कंपनी सिरोंचा येथे कार्यरत आहे. त्यात चव्हाणही आहेत. धुळे येथील रहिवासी असलेले चव्हाण काही दिवसांपूर्वी सुटीवर स्वगावी गेले होते. कालच आपल्या घरून ते परत येऊन पुन्हा कर्तव्यावर हजर झाले होते. सोमवारी संध्याकाळी चव्हाण यांच्या रायफलची गोळी त्यांच्या पोटात घुसली. गंभीर अवस्थेत त्यांना तेलंगनातील वरंगल येथे उपचारांसाठी हलविण्यात आले.
आपली रायफल साफ करताना एक राऊण्ड फायर होऊन चव्हाण हे जखमी झाल्याचे प्रथम सांगण्यात आले. मात्र त्यांच्या रायफलमधून गोळी सुटली नसून वैयक्तिक ताणतणावातून त्यांनी स्वतावर गोळी चालविल्याची चर्चा दबक्या आवाजात पोलीस वर्तुळात सुरू आहे.