अंकीसा (गडचिरोली) : येथून १५ कि.मी. अंतरावर असलेले सोमनुर नवीन, सोमनुर जुना, टेकडा मोटला आदी गावांमध्ये अद्यापही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पोहोचली नाही. या ठिकाणी प्रवाशांना, विद्यार्थी व शेतकऱ्यांना खासगी वाहनांचा वापर करून तालुकास्थळी जावे लागत आहे.
आसरअल्ली येथे को-ऑपरेटिव्ह . बँक आहे. येथे दररोज ग्राहक पैसे काढणे, जमा करणे, विमा बद्दल माहिती घेणे, खाते बुक प्रिंटिंग करणे, नेफ्ट करणे या कामांसाठी ये-जा करीत असतात. तसेच शुक्रवारी आठवडी बाजार भरत असल्याने भाजीपाला खरेदीसाठी शेकडो नागरिकांना ये-जा करावे लागते. बस सेवा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा खिशाला झड बसत आहे.
एसटी ही ग्रामीण भागाला जोडणारा दुवा आहे. सोमनुर येथे त्रिवेणी संगम आहे. सोमनुरला पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी पर्यटकांची तसेच सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची खूपच गर्दी असते. छत्तीसगड व तेलंगाना राज्यातून खाजगी वाहनांनी पर्यटक या ठिकाणी येतात.