लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दरवर्षी जमणारा भक्तांचा मेळा यावर्षीही दिसणार नाही. कोरोनाची दुसरी लाट बऱ्याच प्रमाणात ओसरली असली तरी खबरदारी म्हणून यात्राच रद्द केल्याने सर्व जिल्ह्यांतून सोडल्या जाणाऱ्या एसटीच्या ४ हजार विशेष बसफेऱ्या यावर्षीही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढीला भाविकांना आपापल्या घरी बसूनच मनोमन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून पंढरपूरच्या यात्रेची ओळख आहे. यावर्षी ही यात्रा ११ ते २४ जुलै यादरम्यान हाेणार हाेती. मात्र, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली. राज्यभरातील काही निवडक दिंड्यांच्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील काैंडण्यपूर येथील दिंडीचा समावेश आहे.साेलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पाेलीस आयुक्त व जिल्हा पाेलीस अधीक्षकांना पत्र पाठवून पंढरपूरकडे येणाऱ्या वाऱ्यांना परवानगी देऊ नये, विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर ११ ते २८ जुलै या काळात दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. पंढरपूर येथे पाच दिवसांची संचारबंदी लागू केली जाणार आहे, असे पत्रातून कळविले आहे. त्यानुसार गडचिराेलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एसटीच्या विभाग नियंत्रकांना पत्र लिहिले असून, त्यात वारीसाठी बस उपलब्ध करून दिली जाऊ नये, असे निर्देश दिले आहेत.
एसटीसाठी सर्वात माेठी यात्रापूर्व विदर्भातून पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांची संख्या कमी असली, तरी हजाराे वारकरी बसने पंढरपूरला जात हाेते. पश्चिम महाराष्ट्र व साेलापूर परिसरातील आगारांच्या बस पंढरपूरच्या यात्रेसाठी साेडल्या जातात. त्यांच्याकडे असलेल्या बस कमी पडत असल्याने पूर्व विदर्भातील प्रत्येक आगारातून १० ते १५ बस आणि चालक व वाहक मागविले जात हाेते. काेराेनामुळे गेल्यावर्षी आणि यावर्षीही बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. एसटी महामंडळासाठी सर्वाधिक उत्पन्न देणारी आणि मोठी यात्रा सलग दुसऱ्या वर्षी घडत नसल्यामुळे भाविकांसह एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही हुरहुर लागली आहे.