गडचिरोलीः अहेरी उपविभागातील नागरिकांकरिता प्रवासासाठी एकमेव साधन एसटी महामंडळाची बस आहे. मात्र, या बसेसची अवस्था अतिशय बिकट असून बसेसचे छत गळत असल्याने प्रवाशांना बसेसमध्ये छत्री घेऊस बसावे लागत आहे. या स्थितीचा प्रत्यय अहेरी-सिराेंचा मार्गाने जाणाऱ्या एका बसमध्ये आला.
अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी येथील प्रवाशांना खड्डेमय रस्त्यांनीच प्रवास करावा लागत आहे. पाचही तालुक्यांमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बसेससुद्धा भंगार झाल्या आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अनेक उपक्रम व कार्यक्रम साजरे होत आहेत. मात्र, अहेरी उपविभागातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या नाहीत. अनेक ठिकाणी पक्के रस्ते, वीज, राहण्याची पक्की सोय म्हणून घर, शिक्षण आणि आरोग्य या समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावर चांगल्या बसेस साेडणे गरजेचे आहे. तरीही चांगल्या बसेस पाठविण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे.
अहेरी बसस्थानकातून सिरोंचा येथे मला जायचे हाेते. त्या बसमध्ये मी बसले. काही वेळेतच पाऊस सुरू झाला. आमच्या अंगावर पाणी पडत होते. त्यामुळे बसमधे छत्री उघडावी लागली. परंतु ज्यांच्याजवळ छत्री नव्हती ते प्रवासी पावसाच्या पाण्यामुळे भिजले.
- प्रवासी
अहेरी उपविभागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. छोटी दुरुस्ती आगार पातळीवर करण्यात येत आहे. मोठ्या दुरुस्तीसाठी त्या बसेसची विभागीय कार्यशाळेतच दुरुस्ती करणे आवश्यक आहे. खड्ड्यांमुळे बसेसची बॉडी खिळखिळी होत आहे. त्यामुळे अहेरी आगाराला नवीन २५ बसेस तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी महामंडळाकडे केली आहे.
- चंद्रभूषण घागरगुंडे, आगार व्यवस्थापक अहेरी