अपघात वाढले : रूपाली पंदीलवार यांची मागणी आष्टी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात रहदारी राहते. भरधाव वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने या ठिकाणी गतिरोधक बांधण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रूपाली पंदीलवार यांनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून अहेरी, चामोर्शी, गोंडपिपरीकडे जाता येते. या तिन्ही मार्गावरून येणाऱ्या बसेस याच ठिकाणी थांबतात. आष्टी येथील काळीपिवळी, ट्रॅक्स व इतर मालवाहू वाहने सुद्धा याच ठिकाणी थांबतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ राहते. याच ठिकाणी मुख्य बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचीही गर्दी राहते. बांबूचे ट्रक व लोखंड घेऊन जाणारे ट्रेलरही याच मार्गाने जातात. या ठिकाणी गतिरोधक वाहनांचा वेग कमी केला जात नाही. भरधाव वाहनामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. मात्र बांधकाम विभाग गतिरोधक निर्माण करण्यास चालढकल करीत असल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस या मार्गावर अतिक्रमणधारकांची संख्या वाढत चालली आहे. अतिक्रमीत दुकाने रस्त्यापर्यंत माल ठेवत असल्याने वाहतुकीस अडथळाही होत आहे. अवैध अतिक्रमणधारकांना हटविण्यात यावे, अशी मागणी रूपाली पंदीलवार यांनी केली आहे.
आष्टीतील चौकात गतिरोधक उभारा!
By admin | Published: April 17, 2017 1:43 AM