कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी नवनवीन पिकांचे उत्पादन घेतात. परंतु त्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना याेग्य भाव मिळत नाही. शेतकरी एकरी ३० ते ३५ क्विंटल मका उत्पादन घेतात. सध्या मक्याची मळणी पूर्ण झाली आहे. आज ना उद्या आधारभूत मका खरेदी केंद्र सुरू होईल या आशेवर शेतकऱ्यांचा मका सुकत आहे. शासनाने उन्हाळी धान्य खरेदी केंद्र सुरू केले असताना दुसरीकडे मका पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रति तीव्र असंतोष आहे.
शंकरनगर, पाथरगोटा, पळसगाव, कनेरी या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मका उत्पादन केले आहे. मात्र हमीभाव सुरू होण्यास विलंब हाेत असल्याने १२ ते १३ रुपये किलाेप्रमाणे मक्याची खरेदी खासगी व्यापारी करीत आहेत. यात शेतकऱ्यांची बरीच आर्थिक लूट हाेत आहे. त्यामुळे मका हमीभाव केंद्र लवकर सुरू करावे; अन्यथा रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.