चामाेर्शी : गडचिराेली जिल्ह्यात चामाेर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात अनखाेडा येथील आस्था जिनिंग ॲन्ड प्रेसींगमध्ये शासकीय आधारभूत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असून येथे साेमवारपासून प्रत्यक्ष कापूस खरेदीस सुरूवात झाली आहे.महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघामार्फत सीसीआयचे सब एजन्ट म्हणून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी चामाेर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस विक्रीसाठी नाेंद केली आहे, त्यांना बाजार समितीमार्फत फाेन किंवा एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी या केंद्रावर कापसाची विक्री करून शासनाच्या हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती तथा जि.प. सदस्य अतुल गण्यारपवार यांनी केले आहे. मध्यम धागा कापसाला प्रती क्विंटल ५ हजार ५१५ रुपये व लांब धागा कापसाला प्रती क्विंटल ५ हजार ८२५ रुपये इतका हमी भाव शासनाच्या वतीने या केंद्रावर दिला जात आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्याला कमी किमतीत कापसाची विक्री न करता अनखाेडा येथील आधारभूत केंद्रावर कापसाची विक्री करावी, असे गण्यारपवार यांनी म्हटले आहे.
अनखाेडात आधारभूत कापूस खरेदीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 4:19 AM