गडचिरोली : मातेची उपासना, चैतन्य व उत्साह निर्माण करणाऱ्या नवरात्र उत्सवाला मंगळवारपासून जिल्हाभरात प्रारंभ झाला आहे. जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण ७५१ सार्वजनिक मंडळांमार्फत ५४४ शारदा, तर २०७ दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे. पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली उपविभागात एकूण २३७ सार्वजनिक मंडळांनी नोंदणी केली आहे. या उपविभागांतर्गत १५६ शारदा व ८१ दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कुरखेडा कॅम्प देसाईगंजर्गत १३० शारदा व ५९ दुर्गा, धानोरा उपविभागांतर्गत ४६ शारदा व पाच दुर्गा मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. घोट कॅम्प चामोर्शी अंतर्गत ५५ शारदा व ४४ दुर्गा अशा एकूण ९९ मूर्तींची तर अहेरी उपविभागांतर्गत ७१ शारदा व नऊ दुर्गा अशा एकूण ८० तसेच जिमलगट्टा उपविभागांतर्गत चार शारदा व दोन दुर्गा मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सिरोंचा उपविभागांतर्गत ५९ शारदा व दोन दुर्गा मूर्तींची तर भामरागड उपविभागांतर्गत पाच ठिकाणी शारदा मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. एटापल्ली पोलीस उपविभागांतर्गत १८ शारदा व पाच दुर्गा अशा एकूण २३ ठिकाणी मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.सर्वच दुर्गा व शारदा सार्वजनिक मंडळांमार्फत १० दिवस चालणाऱ्या उत्सवाची जोमात तयार करण्यात आली आहे. आरमोरी, गडचिरोली, अहेरी शहरात नवरात्र उत्सवादरम्यान विविध सामाजिक उपक्रम मंडळांच्या वतीने घेण्यात येणार आहे. या उत्सवादरम्यान गरबा, दांडिया नृत्यांसह विविध स्पर्धांची रेलचेल राहणार आहे. नवरात्र उत्सवात भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस विभागाने शांतता व सुरक्षा राखण्याकरिता सुयोग्य नियोजन केले असून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या उत्सव काळात पोलिसांची दारू व इतर अवैध धंद्यावर करडी नजर राहणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्ह्यात नवरात्र उत्सवाला प्रारंभ
By admin | Published: October 14, 2015 1:53 AM