बोनसची रक्कम अदा करा : काँग्रेसच्यावतीने उपप्रादेशिक व्यवस्थापकांना घेराव लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : प्रशासकीयस्तरावरून सुरू असलेली गोंधळाची स्थिती दूर करीत तत्काळ रब्बी हंगाम धान खरेदी केंद्र सुरू करावे, तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगाम धान विक्रीवरील बोनसची रक्कम अदा करावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने गुरूवारी आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक वानखेडे यांच्या दालनात तब्बल एक तास ठिय्या देत त्यांना घेराव घातला व मागण्या तत्काळ मार्गी न लागल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी धान पिकाची कापणी व मळणी होऊन जवळपास १५ दिवस ते एक महिन्याचा कालावधी उलटत आहे. मात्र आधारभूत धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. नाईलाजास्तव अनेक शेतकरी आपला माल व्यापाऱ्यांना हमी भावापेक्षा २०० ते ३०० रूपये कमी किंमतीत विक्री करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानावर शासनाने प्रतिक्विंटल २०० रूपये प्रमाणे बोनस जाहीर केला. मात्र चार ते पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही त्यांना बोनसची रक्कम मिळाली नाही. याबाबत शेतकऱ्यांकडून संबंधित विभागाकडे वारंवार विचारणा केली जात आहे. मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नसून एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. प्रशासकीय स्तरावरून सुरू असलेल्या गोंधळाच्या स्थितीबाबत जाब विचारण्याकरिता गुरूवारी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक वानखेडे यांना घेराव घोलून चर्चा केली. सदर मागण्या तत्काळ मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयंत हरडे, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, प्रल्हाद कराडे, पं. स. सभापती गिरीधर तितराम, माजी सरपंच अरूण उईके, रोहित ढवळे, खेमराज धोंडणे हजर होते. वरिष्ठांच्या सूचनेनंतर प्रक्रिया राबविणार खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू करण्याबाबत तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र लेखी आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून न मिळाल्याने केंद्र संचालकांनी खरेदी प्रक्रिया राबविण्यास नकार दिला आहे. याबाबत तत्काळ वरिष्ठ कार्यालयाला माहिती देऊन त्यांच्या मार्फतच खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक वानखेडे यांनी सांगितले. तसेच खरेदी केंद्राकडून पुरविण्यात आलेल्या सदोष याद्यांमुळे बोनस वितरण प्रक्रिया रखडलेली असल्याचे मान्य करीत सुधारित याद्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून लवकरच बोनसचे वितरण करण्याचे आश्वासन दिले.
रबीचे धान खरेदी केंद्र सुरू करा
By admin | Published: May 19, 2017 12:21 AM