एटापल्ली : लॉयर्ड्स मेटल या कंपनीने कच्चा लोह दगड नेण्याकरिता सूरजागड जंगलातून कच्चा रस्ता बनविण्यास सुरुवात केली आहे. शेडच्या कामासाठी प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली आहे. लॉयर्ड्स मेटल कंपनीने सूरजागड पहाडीवरील लोह दगड उचलण्यासाठी लिज घेतली असून मागील सात वर्षांपासून कच्चा माल नेण्याकरिता या कंपनीने अनेक प्रयत्न केले. परंतु सर्व प्रयत्न नक्षलाद्यांकडून हाणून पाडण्यात आले. नक्षल्यांकडून सुरुवातीला या कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. त्यानंतर वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. अनेक वाहने जाळले, दोन वर्षांपूर्वी कंपनीचे अधिकारी, कंत्राटदार, सूरजागडचे पोलीस पाटील या तिघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या कंपनीच्या लोकांवर वेगवेगळे सात हल्ले झालेत. तिघांच्या हत्येनंतर कंपनीने या भागातून काम बंद करून माघार घेतली होती. दोन वर्षानंतर मागील आठवड्यात हेडरी गावापासून घनदाट जंगलातून रस्ता बनविण्याच्या कामास कंपनीने सुरुवात केली आहे. हेडरी ते बांडेपर्यंत ५.५० किमी अंतराचा मार्ग बनविण्याचे कंपनीचे नियोजन आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर बांडे-मलमपाडी रस्त्याला जोडून लोहखनिजापर्यंत मार्ग बनवून कच्चा लोहदगड उचल करण्याच्या हालचाली असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी सुद्धा कंपनीने काही गाड्या लोहखनिज नेले आहे. शुक्रवारी हेडरी येथे बाजारात नक्षल्यांनी एका पोलीस शिपायावर गोळी झाडली. या घटनेत ते शहीद झाले. दुसऱ्या दिवशी एका युवकाची हत्या केली. या घटनेनंतर कंपनीने सुरू केलेले रोडचे काम बंद केले आहे. मुख्यमंत्री बुर्गी येथे पोलीस ठाण्याच्या उद्घाटनासाठी आले असताना लोह प्रकल्पाबाबत अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर लॉयर्ड्स मेटल या कंपनीने रस्ता कामात सुरूवात केली. त्यामुळे शासनाने लोह प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.सूरजागड लोह प्रकल्प निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांपासून केंद्रातील मंत्री हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या प्रकल्पामुळे अनेकांना रोजगार मिळेल, अशी शासनाची भूमिका आहे. तालुक्यात मोठ्या पोलिसांचा ताफा तैनात करून प्रकल्प सुरू करायचा, असा मनसुबा दिसून येत आहे. मात्र या प्रकल्पातून तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना येथे नोकऱ्या व रोजगार मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. - सुरेश बारसागडे, संस्थापक अध्यक्ष,जनहितवादी संघटना, एटापल्ली