कागदपत्रांची पाहणी : शहर वाहतूक पोलिसांचा उपक्रमगडचिरोली : शहर वाहतूक शाखेच्या वतीने मागील आठ दिवसांपासून वाहन तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. चौकात कठडे लावून सर्वच वाहनधारकांकडील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. गडचिरोली शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा स्थापन करण्यात आली आहे. या वाहतूक शाखेमध्ये जवळपास १५ कर्मचारी कार्यरत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावे, त्याचबरोबर अवैध वाहनचालकांवर नियंत्रण राहावे, यासाठी मागील आठ दिवसांपासून वाहतूक शाखेच्या वतीने वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम इंदिरा गांधी चौकात चालविली जात आहे. दुचाकीसह चारचाकी, ट्रक चालक यांच्याकडील वाहन चालन परवान्याची तपासणी केली जात आहे. ज्या वाहनधारकांकडे वाहनचालन परवाना आहे, त्यांना वेळीच सोडले जात आहे. मात्र ज्यांच्याकडे वाहनचालन परवाना नाही, अशांकडून स्पॉट फाईन वसूल केले जात आहे. वाहतूक पोलिसांच्या या कामगिरीमुळे वाहतुकीवर नियंत्रण राहण्यास फार मोठी मदत होणार आहे. सायंकाळच्या सुमारास या चौकात वाहनांची गर्दी उसळत असल्याने अशा प्रकारची कारवाई आवश्यक असल्याचे सुजान नागरिकांचे मत आहे. (नगर प्रतिनिधी)२५ पेक्षा अधिक वाहनांवर कारवाईवाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरिक्षक अमृता राजपूत यांच्या मार्गदर्शनात सायंकाळी ४.३० वाजेपासून वाहन तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत वाहन तपासणी मोहीम सुरूच होती. सायंकाळपर्यंत जवळपास २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या या उपक्रमामुळे अवैध वाहन चालकांवर चाप बसण्यास मदत होणार आहे.
वाहन तपासणी मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2016 1:07 AM