ग्रामपंचायतीचे कुलूप उघडले : सरपंच व उपसरपंचाचा पुढाकार कोरेगाव/चोप : देसाईगंज तालुक्यातील चोप येथे गेल्या काही दिवसांपासून नळ पाणी पुरवठा बंद होता. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. दरम्यान संतप्त नागरिकांनी सोमवारी रात्री ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. सरपंच व उपसरपंचांनी पुढाकार घेऊन गावातील नळ पाणी पुरवठा बुधवारी सुरळीत केला. त्यानंतर ग्रामपंचायतीला ठोकण्यात आलेले कुलूप उघडण्यात आले. जोपर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू होणार नाही तोपर्यंत चोप ग्रामपंचायतीचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांना निवेदनातून दिला होता. चोपच्या संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेऊन ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. या संदर्भातील वृत्त लोकमतने प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर बुधवारी चोपच्या सरपंच लिला मुंडले, उपसरपंच कमलेश बारस्कर यांनी तत्परता दाखवून नळ योजना सुरू केली. त्यापूर्वी सरपंच लिला मुंडले यांनी ग्रामस्थांना १२ तासात पाणी पुरवठा सुरू होईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे कुलूप उघडले. दरम्यान काही वेळात गावातील नळ पाणी पुरवठा सुरू झाला. पाणी टंचाईची समस्या मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आल्याची प्रतिक्रिया अनेक ग्रामस्थांनी लोकमत प्रतिनिधीजवळ बोलून दाखविली. (वार्ताहर)
चोप येथील पाणी पुरवठा सुरू
By admin | Published: April 20, 2017 2:07 AM