धानोरा : धानोरा नगरपंचायत क्षेत्रात रोजगार हमीची कामे सुरू करावीत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदार सी.जी. पित्तुलवार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली.
धानोरा नगरपंचायतने २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेचा कामाचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव शासनाच्या रोजगार हमी योजना विभागाने ७ जानेवारी २०२०ला मंजूर केला व जिल्हाधिकाऱ्यांना निधी वितरणाचे आदेश दिले हाेते. परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे बीडीएसची रक्कम विशिष्ट कालावधीत काढण्यात न आल्याने हा निधी परत गेला.
धानोरा नगरपंचायत क्षेत्रात जवळपास पाचशे ते सहाशे जाॅबकार्डधारक आहेत. परंतु धानोरा नगरपंचायतची निर्मिती झाल्यापासून मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे मजुरांवर आर्थिक संकट आहे. रोजगाराच्या शोधात अनेकजण तेलंगणा राज्यात जात आहेत. त्यामुळे धानोरा नगरपंचायत क्षेत्रात रोजगार हमीची कामे लवकर सुरू करून मजुरांसाठी रोजगार उपलब्ध करावा, याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु याकडे दुर्लक्ष झाले. आता पंधरा दिवसाच्या आत रोजगार हमीची कामे सुरू करावी अन्यथा भारतीय जनता पार्टीतर्फे आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी लीना साळवे, बाळू उंदीरवाडे, साईनाथ साळवे, अनंत साळवे, महादेव गणोरकर, विनोद निंबोरकर, सुभाष धाईत, रंजना सोनुले, नलिनी गुरनुले, गजानन परचाके, प्रकाश मारभते, देवराव नरोटे व कार्यकर्ते उपस्थित होते.