लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. या सूचना व नऊ निकषांच्या आधारे तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात, यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व संबंधित सर्व घटकांनी तंबाखू व व्यसनमुक्तीची सुरुवात स्वत:पासून करावी, असे आवाहन जिल्हा तंबाखू सल्लागार डाॅ. नंदू मेश्राम यांनी केले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गटसाधन केंद्र, गडचिराेलीच्यावतीने शुक्रवारी गडचिराेली व आरमाेरी तालुक्यातील सर्व शाळांचे केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची तंबाखूमुक्तीवर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शक म्हणून मेश्राम बाेलत हाेते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा हाेत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या मीना दिवटे, मानसाेपचार तज्ज्ञ दिनेश खाेरगडे उपस्थित हाेते. यावेळी डाॅ. नंदू मेश्राम यांनी तंबाखू सेवनामुळे शरिरावर व आराेग्यावर हाेणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. यावेळी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांनी व्यसनमुक्त शाळा, परिसर आदीबाबत माहिती देऊन ज्या गावात शाळा आहे ते संपूर्ण गाव व्यसनमुक्त करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे, असे सांगितले. शाळा व परिसर व्यसनमुक्त करण्यासाठी येणाऱ्या अडचणी काेणत्या, त्या कशा मार्गी लावता येतील, यावरही चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीना दिवटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटसाधन केंद्राचे साधनव्यक्ती व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.