लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मार्च महिन्याला सुरुवात हाेताच पीककर्जाची रक्कम भरण्याची लगबग वाढली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या एकूण कर्जापैकी शेतकऱ्यांनी ५२ टक्के कर्जाची रक्कम भरली आहे. पुढील १५ दिवसात ९० टक्के कर्जवसुली हाेईल, असा विश्वास बँक प्रशासनाने व्यक्त केला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत २०२१-२२ या खरीप हंगामात १९ हजार ५२६ शेतकऱ्यांना ६८ काेटी ७५ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वितरण करण्यात आले हाेते. त्यापैकी ३५ काेटी ८२ लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी भरले आहे. ३१ मार्चपूर्वी कर्ज भरल्यास शेतकऱ्यांना केवळ मुद्दल भरावी लागते. व्याजाची रक्कम भरावी लागत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी ३१ मार्चपूर्वीच कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करतात. रकमेची जुळवाजुळव करून कर्ज भरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून हाेत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ग्रामीण भागात शाखा आहेत. तसेच कर्मचारी स्थानिक आहेत. त्यामुळे इतर बॅंकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना ही बॅंक आपलीशी वाटते, हे विशेष.
थकीत कर्ज भरल्यास व्याजात सवलत - काही शेतकऱ्यांकडे पीककर्ज थकीत आहे. अशा शेतकऱ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने व्याज सवलत याेजना सुरू केली आहे. या याेजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने कर्जाची संपूर्ण रक्कम एकाचवेळी भरणे आवश्यक आहे.
नियमित कर्जदाराने ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाची रक्कम भरल्यास त्यांना केवळ मुद्दल भरावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरावे. कर्ज भरल्यानंतर एप्रिल ते मे महिन्यात नवीन हंगामाचे कर्ज मंजूर केले जातेे. पुरेसा पैसा हातात असला तर चांगले पीक घेणे शक्य हाेते. - सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिराेली