गडचिरोलीत : आदिवासी विकास विभागाकडून संचालित राज्यभरातील २९ प्रकल्प कार्यालयांतर्गत चालविल्या जाणाºया आश्रमशाळांच्या राज्यस्तरिय क्रीडा स्पर्धा यावर्षी गडचिरोलीत घेण्याचा निर्णय पक्का झाला आहे. प्रथमच हा बहुमान गडचिरोलीला मिळणार आहे.
गडचिरोलीत यापूर्वी तीन वेळा आश्रमशाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा झाल्या आहेत. परंतू राज्यस्तरिय स्पर्धा आतापर्यंत झालेल्या नाहीत. यावर्षीच्या राज्यस्तरिय स्पर्धा अमरावतीला घेण्याची तयारी सुरू होती. परंतू आदिवासी विकास राज्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी हा विषय प्रतिष्ठेचा करून राज्यात सर्वाधिक आदिवासीबहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी सदर स्पर्धा घेण्याची सूचना केली. याशिवाय गेल्यावर्षी नागपूर विभागीय स्पर्धा गडचिरोलीत यशस्वीपणे घेण्यात आल्या. त्या आयोजनातील सुसूत्रपणा पाहून राज्यस्तरिय स्पर्धांच्या आयोजनाची क्षमता गडचिरोलीत असल्याचे दिसून आल्याने हा निर्णय घेण्यात आला. आदिवासी विकास विभागाच्या नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या चार विभागांमधील आश्रमशाळांचे विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये विजेते ठरलेले विद्यार्थी राज्यस्तरिय स्पर्धेत सहभागी होतील.
जानेवारी २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात सदर स्पर्धा होण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना निमंत्रित केले आहे. त्यांची तारीख मिळाल्यानंतर स्पर्धेची तारीख निश्चित होईल, असे गडचिरोली आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.