संभ्रमावस्था कायम : विजय वडेट्टीवार यांची मागणीगडचिरोली : गोदावरी नदीवर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी २ मे रोजी मेडिगड्डा-कालेश्वर धरणाचे भूमिपूजन करून ८ हजार ८७६ कोटी रूपयांच्या कामाची निविदा सुध्दा काढली आहे. आता या कामास लवकरच सुरूवात होणार आहे. सिरोंचा तालुक्यातील २२ गावे व २६ हजार हेक्टर क्षेत्र या धरणामुळे बाधित होणार आहे. या धरणाबाबत महाराष्ट्र सरकारने अद्याप खुलासा केला नाही. शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ उपगटनेते, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी मेडिगड्डा धरणाबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. परंतु महाराष्ट्र सरकारकडून धरणाच्या कामास कोणतीही परवानगी दिली नाही. महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे पाणी कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. धरणाच्या बांधकामासाठी सर्वेक्षण करून किती गावे बाधित होणार, किती शेती पाण्याखाली येणार व किती गावांचे पुनर्वसन होणार याबाबत एएमयू करार झाले आहेत. बांधकामाला परवानगी दिली नाही, असा खुलासा जलसंपदा मंत्र्यांनी केला आहे. याबाबत आमदार वडेट्टीवार यांनी आश्चर्य व्यक्त केली असून महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली नाही तर तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कालेश्वर धरणाचे भूमिपूजन कसे केले, निविदा कशा काढल्या, आता प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असताना राज्य शासन चूप बसणार काय, या धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याने शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
मेडिगड्डा प्रकल्पाविषयी राज्याने भूमिका स्पष्ट करावी
By admin | Published: May 08, 2016 1:20 AM