लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : राज्य परिवहन महामंडळात कार्यरत कामगारांचे वेतन नियमित दिले जात नाही. तसेच वेतन थकबाकी आहे व विविध प्रकारचे भत्ते मिळण्यास विलंब हाेत आहे. त्यामुळे कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे सर्व प्रश्न घेऊन त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिराेली व अहेरी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी २७ ऑक्टाेबरपासून बेमुदत उपाेषण सुरू केले. दुसऱ्या दिवशीही आंदाेलन सुरूच हाेते.वेतन वेळेवर हाेत नसल्याने आर्थिक नैराश्यापोटी गडचिराेली येथील कामगारांनी बेमुदत उपाेषण सुरू केले आहे. ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी शासकीय नियमाप्रमाणे तसेच दिवाळी भेट १५ हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्यात यावी, अशी मागणी करीत राज्यभरातील विविध कामगार संघटनांच्या कृती समितीच्या वतीने २७ ऑक्टाेबरपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. अशा प्रकारच्या मागण्यांसाठी राज्यभर उपाेषण सुरू करण्यात आले आहे. गडचिराेलीतही आंदाेलन सुरू आहे.
वार्षिक वेतनवाढ रखडलीराज्य परिवहन प्रशासनाने ३० जून २०१८ राेजी परिपत्रकाद्वारे केलेला निर्णय अद्यापही लागू केला नाही. कामगारांना वार्षिक वेतनवाढ ३१ टक्के व घरभाडे भत्त्याचा दर लागू केलेला नाही, हे अन्यायकारक आहे. जुलै २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीची तीन महिन्यांची २ टक्के व जानेवारी २०१९ ते २०२१ या कालावधीची नऊ महिन्यांची ३ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अद्याप मिळाली नाही. तसेच वाढीव ५ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला नाही. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळातील कोविड भत्ता मिळाला नाही, असे कामगारांनी म्हटले आहे.
अहेरीतही बेमुदत उपोषण सुरूचअहेरी: राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगराच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गुरूवारीही आंदाेलन सुरूच हाेते. उपाेषण आंदाेलनात एन. बी. घायाळ, विजय गेडाम, स्नेहा चांदेकर, मयूरी गोरले, निर्मला सिडाम, टी. बोरोळे, सुनील पिपरे, प्रवीण गावंडे, किशोर खडसे, गायकवाड सुहास हंबर्डे आदी उपस्थित होते.