आजच्या घडीला देशात डेल्टा प्लसमुळे अधिक रुग्ण कोरोनाग्रस्त होत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातही डेल्टा प्लसचे सहा रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे याविरुध्द लढण्याकरिता लसीकरण हे एकच शस्त्र आपल्या हाती असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्ह्यात जवळपास ७.९० लाख नागरिकांनी कोरोना लस घेणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात ३ लाख १९ हजार नागरिकांनी पहिला तर ८१ हजार ५१९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. हे प्रमाण अनुक्रमे ४० व १० टक्के आहे.
(बॉक्स)
कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवस विशेष मोहीम
शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सर्व कर्मचाऱ्यांकरिता दि.२८ आणि ३० ऑगस्टला दोन दिवस विशेष मोहीम घेतली जात आहे. ज्यांचा दुसरा डोस पूर्ण व्हायचा आहे त्यांनी या दोन दिवसी लसीकरण करून घ्यावे आणि स्वत:सह आपल्या कुटुंबाला सुरक्षित करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
(बॉक्स)
लस घेणाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण अल्प
ज्या डेल्टा प्लसग्रस्त कोरोना रुग्णांनी लस घेतली आहे, त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. त्यामुळे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाच्या सुरक्षिततेकरिता आपण लसीकरण करून घ्यावे आणि दोन्ही डोस विहित मुदतीत घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी केले आहे.