गडचिरोली : भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर वसलेले, लाहेरीपासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या कुमणार या गावातील नागरिकांना अजूनही बांबूपासून बनविलेल्या तात्पुरत्या पुलाचाच आधार घ्यावा लागत आहे.
रस्ता, पूलच नाही तर इतर कोणत्याही सोयी-सुविधा या गावात पोहोचलेल्या नाहीत. संपूर्ण माडिया आदिवासी जमातीच्या या गावात अवघे ४० ते ५० लोक राहतात. या गावातील दोनच मुले प्राथमिक शाळेत शिक्षण घेतात. उर्वरित सर्व लोक निरक्षर आहेत. महसुली गावाचा दर्जा नसला तरी कुटुंबांचा निवासी समूह म्हणून या गावाचा उल्लेख केला आहे. गावाला जोडणारा रस्ता, अंतर्गत रस्ते, विद्युत जोडणी, अंगणवाडी अशा कोणत्याही पायाभूत सुविधा येथे नजरेस पडणार नाहीत.
या गावात आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण किंवा रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आढळले नाही. तशी नोंद आरोग्य विभागाकडे नाही. विशेष म्हणजे या गावातील एकाही व्यक्तीने लससुद्धा अद्याप घेतली नाही. तालुक्याची यंत्रणा त्या गावात कदाचित पोहोचलीच नाही. एकीकडे जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम देशात यशस्वीपणे राबवली गेल्याचे बोलले जाते, पण या गावात लसीकरण केव्हा, असा प्रश्न लोक विचारत आहेत.