गडचिरोली : गडचिरोली या अतिमागास जिल्ह्यात वडसा येथे जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक आहे. जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्ग, नागरिक व आवागमन करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचे असे वडसा रेल्वेस्थानक आहे. मात्र, या ठिकाणी सर्वच रेल्वेगाड्यांचे थांबे नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांच्या अडचणींचा विचार करून वडसा येथे रेल्वेच्या सर्व जलद गाड्यांचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी खा. अशाेक नेते यांनी लाेकसभेत केली. खा. नेते यांनी नियम ३७७ अधिसूचनेंतर्गत लोकसभेत केली व चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय संसदेत मांडला. नागरिकांना वडसा रेल्वेस्थानकावरूनच आवागमन करावे लागते. मात्र, येथे मोजक्याच रेल्वेगाड्यांचे थांबे असल्याने नागरिकांना गोंदिया, नागपूर, शहर तथा अन्य राज्यात प्रवास करणे अडचणीचे होत आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून लोकसभा क्षेत्रातील जनतेची मागणी असतानाही याकडे रेल्वे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याची दखल घेऊन केंद्र शासनाने याबाबत उचित निर्देश देऊन सर्व सुपर रेल्वेगाड्यांचा थांबा वडसा येथे देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी ३७७ अधिसूचनेनुसार खा. अशोक नेते यांनी लोकसभेत केली.
बाॅक्स....
लाेकमतने वेधले हाेते लक्ष
वडसा रेल्वे स्टेशनवरून आता दरराेज जबलपूर-चांदाफाेर्ट एक्स्प्रेस गाडी सुरू झाली आहे. याशिवाय इतरही अनेक सुपरफास्ट गाड्या वडसा रेल्वेस्थानकावरून जातात. पण कोणत्याच गाडीचा थांबा सध्या वडसा येथे देण्यात आलेला नाही. ही बाब लाेकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. लाेकमतच्या वृत्ताची दखल घेऊन खा.नेते यांनी लाेकसभेत हा मुद्दा आग्रहीपणे मांडला.