युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा : विभागीय वाहतूक नियंत्रकास निवेदन गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मूल मार्गावर असलेल्या कनेरी बसथांब्यावर जलद बस थांबत नाही. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची अडचण होत आहे. कनेरी येथे जलद बसथांबा मंजूर असूनही बस थांबविण्यास एसटी चालक, वाहक टाळाटाळ करीत आहेत. कनेरी येथे जलद बस थांबविण्यात यावी, अन्यथा युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र सचिव कुणाल पेंदोरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी एसटी प्रशासनाला दिला आहे. या संदर्भात युवक काँग्रेसच्या वतीने गडचिरोली येथील विभागीय वाहतूक नियंत्रक नीलेश बेलसरे यांना शुक्रवारी निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, २०१३ मध्ये तत्कालीन आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आगार व्यवस्थापकांकडे पाठपुरावा करून कनेरी येथे जलद बसचा थांब्यास मंजुरी मिळवून घेतली. मात्र गडचिरोली एसटी आगाराचे चालक व वाहक मनमानी करून कनेरीच्या थांब्यावर जलद बस थांबत नाही. कनेरी बसस्थानक येथून इंदाळा पारडी येथील विद्यार्थी गडचिरोलीच्या महाविद्यालयात दररोज ये- जा करतात. मात्र जलद बस येथे थांबविली जात नसल्याने विद्यार्थ्यांना उशिरापर्यंत साधारण बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे कनेरी बसथांब्यावर जलद बस थांबविण्यात यावी, मूल मार्गावर सायंकाळी ५.३० व ६ वाजता मूलसाठी साधारण बसफेऱ्या सोडण्यात याव्या, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष रितेश राठोड, काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे जिल्हा महासचिव कमलेश खोब्रागडे, शहर सचिव पंकज बारसिंगे, तौफिक शेख, मयूर पेद्दिवार, मनीष मेश्राम, भूषण ठाकरे, भाष्कर ठाकरे, प्रणय लोंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दोन दिवसांत मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन आगार प्रमुखांनी दिले. (प्रतिनिधी)
कनेरी थांब्यावर बस थांबवा
By admin | Published: April 01, 2017 2:04 AM