जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार व निवेदन : अण्णा हजारे विचार मंचची मागणी गडचिरोली : गडचिरोली शहरातील तलावावर करण्यात आलेले अतिक्रमण हटवून गौण खनिजाचे अवैध उत्खनन व चोरटी वाहतूक बंद करावी, अशी मागणी अण्णा हजारे विचार मंचच्या वतीने नवयुक्त जिल्हाधिकारी अमगोथू श्रीरंग नायक यांच्याकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नायक यांची त्यांच्या दालनात विचारमंचच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेऊन त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन केला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. निवेदनात, तलावाचे सौंदर्यीकरण करावे, नगरभवन बांधकामातील गैरव्यवहाराची चौकशी करावी, वनहक्क दावेदारांना पट्ट्यांचे वितरण करावे, वनहक्क पट्टे तयार करताना झालेल्या घोळाची चौकशी करावी आदी मागण्यांचा समावेश होता. सत्कारप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, अण्णा हजारे विचारमंचचे जिल्हा प्रमुख बसंतसिंह बैस, तालुका प्रमुख अनुरथ नीलेकार, सचिव देवेंद्र ब्राम्हणवाडे, संदीप कांबळे, दिवाकर रामटेके, नारायण खोब्रागडे, भारत मून, तुलाराम नैताम, नरेंद्र पोवणवार, प्रा. अशोक लांजेवार उपस्थित होते.
गौण खनिजांचे अवैध उत्खनन बंद करा
By admin | Published: May 24, 2016 1:40 AM