गडचिरोली : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने नुकतीच गडचिरोली येथील कृषी केंद्राची तपासणी केली. यात बियाण्याच्या परवान्यातील उगम प्रमाणपत्र अवैध असल्याचे दिसून आले. याशिवाय मुदतबाह्य कीटकनाशकेही आढळून आल्याने पथकाने गडचिरोली शहरातील तीन कृषी केंद्रांना खत, बियाणे व कीटकनाशके विक्री बंदचे आदेश दिले आहे. कृषी विभागाच्या पथकाने गडचिरोली येथील हिमालया कृषी केंद्रात धाड टाकून तपासणी केली असता, बियाणे परवान्यामध्ये समाविष्ठ उगम प्रमाणपत्र अवैध असल्याचे दिसून आले. तसेच मुदतबाह्य कीटकनाशके आढळून आले. त्यामुळे या कृषी केंद्राला ३० क्विंटल धान बियाणे व २८२ कीटकनाशके विक्री बंदचे आदेश देण्यात आले. येथीलच विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनच्या कृषी केंद्रात तपासणी केली असता, २० : २० : ० : १३ हे खत विक्रीस पात्र नसल्याचे अमरावती येथील प्रयोगशाळेने अहवाल सादर केला. त्यानुसार या कृषी केंद्रास सदर खत विक्री बंदचे आदेश देण्यात आले. पिराणी कृषी केंद्रात १८ : १८ : १० भगीरथच्या पाच टन खत विक्रीस बंदचे आदेश देण्यात आले. सदर कारवाई जिल्हा कृषी अधिकारी शेरेन पठाण, तालुका कृषी अधिकारी रेणू दुधे, गुण नियंत्रण निरिक्षक मनिषा राजनहिरे, पं.स.चे कृषी विस्तार अधिकारी दीपक जंगले यांनी कायद्यानुसार केली. (प्रतिनिधी)
तीन केंद्रातील खत व बियाणे विक्री थांबविली
By admin | Published: July 05, 2016 2:15 AM