गडचिरोली : मनोज अपना जिम्मेदारी से रोड निर्माण कार्यों को करने की खबर है... जिम्मेदारी लेना छोड दो, रोड निर्माण कार्य को बंद करो, वरना ठीक नही होगा... अशा आशयाची धमकी देणारे पोस्टर एटापल्ली तालुक्यातील हालेवारा- मवेली रस्त्यावर आढळल्याने १६ मार्च रोजी एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी ही बाब गंभीर घेतली असून पोस्टर्स लावणाऱ्याचा शोध सुरू आहे. मात्र, ठेकेदारातील अंतर्गत वादातून नक्षलवाद्यांच्या नावे हे पोस्टर लावल्याचा गुप्तचर यंत्रणेचा कयास आहे.
हालेवारा- मवेली या १० किलोमीटर अंतरावरील रस्त्याच्या कामासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया पार पडली. या कामासाठी सात ते आठ ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. या रस्त्याचे काम मिळावे, यासाठी ठेकेदारांमध्ये स्पर्धा होती. मात्र, या रस्त्याचे काम हे गौतम अधिकारी या कंत्राटदार कंपनीला मिळाले. मनोजकुमार हे या कंपनीचे पर्यवेक्षक असून त्यांच्या नावे धमकीचा संदेश आहे. दरम्यान, या रस्त्याचे काम अद्याप सुरू नाही, पण कंत्राट न मिळाल्याच्या रागातून नक्षलवाद्यांच्या नावे लाल कापडावर धमकीवजा मजकूर लिहून हे पोस्टर्स खोडसाळपणातून लावल्याचा गोपनीय यंत्रणेचा अंदाज असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली. हे पोस्टर्स आढळल्यावर १६ मार्च रोजी सकाळी हालेवारा पोलिसांनी धाव घेेतली. पोस्टर्स ताब्यात घेऊन उपपोलिस ठाण्यात नोंद केली आहे.
हे पोस्टर्स नेमके कोणी लावले, या निष्कर्षापर्यंत अद्याप पोलिस पोहोचलेले नाहीत. त्यावर आताच प्रतिक्रिया देणे उचित होणार नाही. याचा तपास सुुरू आहे. कंत्राटदार कंपनीने अद्याप कामाला सुरुवात केलेली नाही. त्यांना आवश्यकतेनुसार योग्य ते संरक्षण देण्यात येईल.
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली