लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात वादळाने थैमान घातले. घोंघावत आलेल्या या जोरदार वादळामुळे शहरातील अनेक ठिकाणची झाडे, घर, टपऱ्यांचे नुकसान झाले. शिवाय वीजेच्या ताराही कोसळल्या. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला. गडचिरोली शहरासह आरमोरी, देसाईगंज तसेच अहेरी उपविभागाच्या गावांमध्येही रात्रीच्या सुमारास जोरदार वादळ आले. त्यामुळे रात्रभर अर्ध्या जिल्ह्याचा वीज पुरवठा खंडीत झाला होता.गडचिरोली येथील वीज कर्मचाऱ्यांनी रात्रभर बिघाड शोधून शहरातील जवळपास २५ टक्के भागाचा विद्युत पुरवठा सुरळीत केला. त्यानंतर उर्वरित शहराचा विद्युत पुरवठा सोमवारी दुपारी १२ नंतर सुरू झाला. वीज पुरवठा खंडीत झाल्याने रात्रभर नागरिकांचे हाल झाले. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी नळाचे पाणीही मिळाले नाही. महिलांची नळावर गर्दी दिसून येत होती. वादळाचा सर्वाधिक फटका अतिक्रमण करून रस्त्याच्या बाजुला उभारण्यात आलेल्या टपऱ्यांना बसला. अनेक टपऱ्यांचे छत उडून गेले. सोमवारी सकाळीच दुकानदारांनी दुरूस्तीला सुरूवात केली. वीज पुरवठा खंडीत झाल्याने गडचिरोली शहरातील नळ पाणी पुरवठा प्रभावित झाला.वैरागडात वादळाने घराचे छत उडालेरविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यासह जिल्हाभरात जोरदार वादळ आले. या वादळामुळे आरमोरी तालुक्यातील डोंगरसावंगी येथील मन्साराम शिवा घरत यांच्या घराचे छत उडून ते रस्त्यावर पडले. रात्री झालेल्या वादळी पावसामुळे वैरागड भागातील जनजीवन काही वेळासाठी विस्कळीत झाले होते. वैरागड भागात अनेक घरांची अंशत: पडझड झाली. मात्र घराच्या नुकसानीचा आकडा मिळू शकला नाही.कलेक्टर कॉलनीतील चार शासकीय निवासस्थानांचे छत उडालेकॉम्प्लेक्स परिसरातील वार्ड क्रमांक १४ मधील कलेक्टर कॉलनीतील चार शासकीय निवासस्थानावरील छत रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास आलेल्या वादळाने उडाले. या निवासस्थानातील इलेक्ट्रिक वायरींग तुटली. याशिवाय विसापूर व विसापूर टोली भागात वेगवेगळ्या चार ठिकाणी रस्त्याच्या कडेला वादळाने मोठी झाडे कोसळली. मात्र या दोन्ही भागात वादळाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.कर्मचाऱ्यांना दुसरे क्वॉर्टर लवकरच मिळणारकलेक्टर कॉलनीतील कर्मचाऱ्यांचे शासकीय निवासस्थानातील छत रात्री झालेल्या वादळाने कोसळून ते बाजूला पडले. यामुळे सदर कर्मचाऱ्यांना या क्वॉटरमध्ये राहणे शक्य नाही. सदर बाब माहित होताच कॉम्प्लेक्स वार्ड क्रमांक १४ चे नगरसेवक संजय मेश्राम यांनी सकाळी कलेक्टर कॉलनीच्या या भागात भेट देऊन छत कोसळलेल्या क्वॉर्टरची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चे सहायक अभियंता अभिजित कुचेवार हे ही उपस्थित होते. या अभियंत्याशी नगरसेवक मेश्राम यांनी छत कोसळल्याच्या बाबीवर विस्तृत चर्चा केली. सदर क्वॉटरमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरच दुसरे क्वॉटर देण्यात येईल, असे आश्वासन कुचेवार यांनी त्यांना दिले. विशेष म्हणजे, दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना दुसऱ्या क्वॉटरच्या चाव्या अभियंता कुचेवार यांनी दिल्या.
वादळाने छत व झाडे कोसळली; वीज पुरवठा रात्रभर खंडित
By admin | Published: May 30, 2017 12:40 AM