ंअहेरी/आलापल्ली : आलापल्लीसह अहेरी तालुक्यातील अनेक भागात सोमवारच्या रात्री वादळी वार्यासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज पुरवठा १२ तास खंडीत झाला होता. आलापल्ली शहराचा विद्युत पुरवठा रात्रभर खंडीतच होता. वादळी वार्यामुळे आलापल्लीत वनविभागाच्या टेमडी कॉलनीतील अनेक घराचे टिन पत्रे उडून गेले. वसाहतीत सुरूवातीला कवेलू होते. परंतु दोन महिन्यापूर्वीच कवेलू काढून टिन पत्रे लावण्याचे काम करण्यात आले होते. तेही वादळी पावसाने उडून गेले आहे. अहेरी तालुक्यात अनेक भागात वीज तारांवर झाडे तुटून पडल्याने वीज पुरवठाही खंडीत होता. बोरी, राजपुर पॅच, आलापल्ली, अहेरी आदी ठिकाणी मोठे झाडे वीज तारांवर पडल्याने तारे तुटले. आज सकाळपासून नागरिक तसेच महावितरणाचे लोक झाडे हटवून तारे व्यवस्थित करण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले. अनेक गावांमध्ये वीज खांब वाकलेले आहेत. बोरी येथे रस्त्यावर झाड पडल्याने वीज खांबानाही हानी झाली. वीज तार तुटून सोमवारच्या रात्रीपासून वीज पुरवठाही खंडीत झाला होता. अहेरी-आष्टी मार्गावरची वाहतूक काही काळ बंद होती. त्यानंतर सकाळी नागरिक व महावितरण कंपनीचे अधिकारी बोरी येथे पोहोचले. त्यांनी रस्त्यावर पडलेले मोठे झाड बाजुला करून वाहतूक सुरळीत केली. या भागात अनेक घरांवरचे कवेलू व टिनपत्रे उडून गेले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आलापल्लीत वादळाने नुकसान
By admin | Published: May 20, 2014 11:39 PM