बोलेपल्ली मदत केंद्राला फटका : वादळासह गारपीट झाली; वीज पुरवठा दिवसभर खंडितलोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील पोलीस मदत केंद्र अतिसंवेदनशील भागात आहेत. पोलीस मदत केंद्राच्या आवारात पोलीस जवानांना राहण्यासाठी टिनाचे शेड उभारण्यात आले आहेत. यामुळे या पोलीस जवानांना नक्षल्यांशी लढण्यासोबतच वादळी पाऊस, गारपीटीचाही सामना करावा लागतो. पक्क्या निवासस्थानांअभावी टिनाच्या शेडमध्ये राहणाऱ्या मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली पोलीस मदत केंद्रात कार्यरत पोलीस जवानांना सोमवारी सकाळीच आलेल्या वादळाचा फटका सहन करावा लागला आहे.बोलेपल्ली पोलीस मदत केंद्राच्या आवारात पोलीस जवानांनी टिनाचे शेड उभारले आहेत. या ठिकाणी आपल्या परिवारासोबत राहतात. आज सकाळी आलेल्या वादळामुळे मात्र संपूर्ण टिनपत्रे उडाली. यामुळे जवानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भिंतींनासुध्दा टिनाचाच आधार दिला होता. यामुळे वादळामुळे सर्वत्र टिनपत्रे उडाली होती. यामुळे पोलीस जवानांना पोलीस मदत केंद्राच्या आवारात तंबू उभारून रहावे लागले. काही वेळानंतर वादळ थांबल्यानंतर पोलिसांनी आपल्या छताची डागडूजी करण्यास प्रारंभ केला. मात्र असे वादळ नेहमी येत असल्यामुळे पोलिसांच्या निवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात अनेक अतिसंवेदनशिल गावांमध्ये उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्रामध्ये अशीच परिस्थिती आहे. यामुळे नक्षल्यांशी सामना करण्यासोबतच जिल्ह्यातील पोलीस जवान उन्ह, वारा, पाऊस यासोबतही तेवढाच सामना करीत असल्याचे स्पष्ट होते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गोमणीजवळ झाड कोसळलेमुलचेरा तालुक्यातील गोमणीपासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या नाल्यावर सोमवारी सकाळी झालेल्या वादळामुळे झाड कोसळले. यामुळे तब्बल तीन तास वाहतूक ठप्प पडली होती. झाड विद्युत रोहित्रावर कोसळल्यामुळे वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला होता. जेसीबीने झाड हटविला.
वादळाने पोलीस निवासस्थानांचे छत उडाले
By admin | Published: June 06, 2017 12:47 AM