जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील पळसगाव - अरतताेंडी महादेवगड या चार किमी रस्त्याचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी देवस्थान कमिटी व भाविकांनी केली आहे.
पळसगाव - अरततोंडी जुनी पहाडीवर शंकर महादेवाचे देवस्थान आहे. गेल्या दहा वर्षांपासन शेकडो किमी अंतर प्रवास करुन भाविक महादेवाच्या दर्शनाकरिता येतात. दोन्ही गावांच्या पुढाकाराने भागवत सप्ताहदेखील येथे पाळला जाताे. आजी - माजी लोकप्रतिनिधी आणि दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराने आजपर्यंत विद्युत व्यवस्थेपासून ते काही प्रमाणात पायऱ्या, पाणी व निवासस्थानाची व्यवस्था झाली आहे. सन २०१७ - १८मध्ये जुन्या पांदण रस्त्यावर ग्रामीण राेजगार हमी याेजनेतून मातीकाम व मुरुम टाकण्यात आला. परंतु अजूनही छोट्या छोट्या नाल्यांवर मोरी बांधकाम झालेले नाही. तसेच भाविकांच्या वर्दळीमुळे महाशिवरात्रीला व भागवत सप्ताहाच्या वेळी प्रचंड गर्दी राहाते. मार्ग कच्चा असल्याने धुळीचा त्रास सहन करावा लागतो. धुळीमुळे शारीरिक हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महादेवगड पहाडीचा विकास व पर्यटनस्थळ म्हणून विकास होण्याकरिता देवस्थानपर्यंत मजबूत रस्त्याची आवश्यकता आहे. शासनाने महादेवगड पांदण रस्त्याचे मजबुतीकरण लवकर करावे, अशी मागणी देवस्थान कमिटी व भाविकांनी केली आहे.