सिराेंचा : तीन दिवसांपूर्वी प्राणहिता नदी पुलाजवळ तेलंगणा राज्याच्या हद्दीत गडचिरोली जिल्ह्यातील दाेन दुचाकींच्या धडकेत तीन युवक जागीच ठार झाले हाेते. या घटनेनंतर तेलंगणा पाेलिसांनी त्यांच्या हद्दीत नदीपुलाजवळ वाहन तपासणीला सुरुवात केली आहे. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील लोक पूल ओलांडून तेलंगणा राज्यात मद्यप्राशनासाठी जातात.
महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची सीमा असलेल्या प्राणहिता नदीवर तेलंगणा सरकारने दाेन वर्षांपूर्वी पूल बांधला. सिराेंचा तालुक्यातील अनेकांचे नातेवाईक तेलंगणा राज्यात असल्याने या पुलावरून वाहनांची माेठी वर्दळ राहते. रस्ता अतिशय चांगला असल्याने दुचाकी तसेच चारचाकी वाहने सुसाट वेगाने चालविली जातात. त्यामुळे नदीपुलाजवळ अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेलंगणा येथील कोटापल्लीचे पोलीस निरीक्षक नागराज यांचा मार्गदर्शनात राष्ट्रीय महामार्ग क्र.६३ वर तेलंगणा हद्दीत लक्ष्मीपूर येथे साेमवारपासून वाहन आणि वाहनचालकांची तपासणी जोमात सुरू करण्यात आली.
मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर आणि योग्य कागदपत्रे नसलेल्यांवर दंड आकारण्यात येत आहे. दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचा सल्ला यावेळी देण्यात येत आहे. ही तपासणी आम्ही कायम ठेवू, असे कोटापल्ली पोलीस स्टेशनचे निरीक्षक नागराज यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
===Photopath===
230221\23gad_1_23022021_30.jpg
===Caption===
फोटो ओळ- वाहनचालकाने मद्यप्राशन केले आहे का, याची तपासणी करताना तेलंगणा पोलीस.