देसाईगंज : देसाईगंज हे जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे. मुख्याधिकारी व पाेलीस विभागाने वीकेंड लाॅकडाऊनला यशस्वी करण्याचे आवाहन जनतेला केले हाेते. त्यामुळे शनिवारी शहरातील मेडिकल वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती. बाजारपेठेतील रस्त्यांवर नेहमी वर्दळ राहते. लाॅकडाऊनमुळे रस्ते ओस पडले हाेते.
आरमाेरी : आरमाेरीत मागील चार दिवसांपासूनच दुकाने बंद ठेवली जात आहेत. लाॅकडाऊनच्या दाेन्ही दिवशी दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती. आरमाेरी शहरातून राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे या महामार्गावरून देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागपूर, गडचिराेली व ग्रामीण भागासाठी अनेक प्रवासी व मालवाहू वाहने रात्रंदिवस धावत राहतात. मात्र शनिवारपासून ही वाहने पूर्णपणे ठप्प पडली आहेत. रस्ते सुनसान झाले आहेत.
काेरची : ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांमुळे काेरचीतील बाजारपेठ नेहमी फुलून राहते. मात्र लाॅकडाऊनमुळे ग्रामीण भागातील नागरिक काेरचीकडे फिरकले नाहीत. त्यामुळे रस्ते ओस पडले हाेते. औषधीची दुकाने वगळता पानठेले, चहाटपऱ्या, फळविक्रीसह इतर सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती.
आष्टी : वीकेंडच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा आष्टी येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली हाेती. बसस्थानकावर माेजकेच प्रवासी दिसून येत हाेते. चंद्रपूर, गडचिराेलीसाठी काही निवडक बसफेऱ्या सुरू हाेत्या. त्यामुळे प्रवाशांना वाट पहावी लागत हाेती. पाेलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे यांच्या नेतृत्वात पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. कारण नसताना घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पाेलिसांमार्फत हटकले जात हाेते. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या फार कमी हाेती. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, कारण नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले जात हाेते.
धानाेरा : धानाेरा येथील बाजारपेठ सलग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली हाेती. औषधी दुकाने, पेट्राेलपंप वगळता इतर सर्वच दुकाने बंद हाेती.
चामाेर्शी : लाॅकडाऊन असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक चामाेर्शी शहरात दाखल झाले नाही. त्यामुळे शहराच्या बाजारपेठेतील रस्ते ओस पडले हाेते. आपल्या वाॅर्डात कामानिमित्त नागरिक बाहेर पडत असले तरी मुख्य रस्ता व बाजारपेठेकडे जाण्यास धजावत नव्हते. काही माेजक्या बसफेऱ्या सुरू हाेत्या.
एटापल्ली : एटापल्ली शहरातील मेडिकल वगळता सर्वच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली हाेती.