लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दिवाळीच्या सणादरम्यान भाऊबीजेसाठी दरवर्षी माहेरापर्यंत साेडून देणाऱ्या एसटीची चाके कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनामुळे पूर्णपणे थांबली आहेत. त्यामुळे माहेराला कसे जावे, असा प्रश्न अनेक बहिणींना पडला आहे. भाऊबीजेच्या सणासाठी प्रत्येक बहीण भावाच्या घरी जातेच. बहीण येणार नसेल तर भावाचे कुटुंब तरी बहिणीच्या घरी जाते. त्यामुळे भाऊबीजेसाठी बसस्थानकांवर माेठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढते. या कालावधीत एसटीला माेठ्या प्रमाणात प्रवासी मिळत असल्याने या कालावधीला गर्दीचा हंगाम संबाेधले जात हाेते. मात्र विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वीपासूनच एसटीची सेवा ठप्प पडली आहे. दुसऱ्या गावावरून दिवाळीसाठी गावाकडे परत येणाऱ्यांनाही खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागला. आताही संप आणखी किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रवाशांचे हालच हाेणार आहेत. अशा स्थितीत संप कधी मिटणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
खासगी वाहने हाऊसफुल्ल- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनाचा पुरेपूर फायदा खासगी वाहतूकधारकांनी घेणे सुरू केले आहे. बसस्थानकासमाेरच वाहने उभी करून प्रवाशांची उचल केली जात आहे. मागील आठ दिवसांपासून खासगी प्रवासी वाहने प्रवाशांनी फुल भरून जात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनामुळे खासगी वाहतूकदारांची चांदी झाली आहे.
कमी खर्चात अधिक उत्पन्नाची संधी गमावली
काेराेनातून सावरत असलेल्या एसटीला दिवाळीच्या कालावधीतून उत्पन्न मिळवून परिस्थिती सुधारण्याची संधी हाेती. मात्र ही संधी कामबंद आंदाेलनाने गमावल्या गेली आहे. दिवाळीपूर्वीचे उत्पन्न तर आधीच बुडाले आहेत. आंदाेलनाचा तिढा न सुटल्यास दिवाळीनंतरच्याही उत्पन्नावर पाणी फेरावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ताेडगा निघून आंदाेलन संपावे, अशी मागणी प्रवाशांकडून हाेत आहे.
एसटीने नुकतीच तिकीट वाढ केली आहे. तसेच डिझेलचे दर प्रतिलीटर १० रुपयांनी कमी झाले. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी हाेती. मात्र ही संधी एसटीने गमावली आहे.
माझे माहेर अमरावती जिल्ह्यातील आहे. आजपर्यंत आम्ही गडचिराेलीवरून जाणाऱ्या अमरावती बसने माहेरी जात हाेताे. मात्र यावर्षी बसेस बंद आहेत. खासगी वाहनांमध्ये प्रचंड गर्दी उसळणार आहे. त्यातच काेराेनाची भिती आहे. त्यामुळे यावर्षी भावाकडे जाणार नाही.- उज्वला चाैधरी
दिवाळीच्या सणादरम्यान शक्यताे संपूर्ण कुटुंबच दुसऱ्या गावाला जाण्यासाठी घराबाहेर पडते. त्यामुळे दुचाकी वाहनाने प्रवास करणे शक्य हाेत नाही. चारचाकी वाहनच आवश्यक राहते. मात्र बहुतांश कुटुंबांकडे चारचाकी वाहने नाहीत. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही. अशा कुटुंबाचे कुटुंबांचे हाल हाेणार आहेत. बस बंद असल्याने अनेक बहिणींनी यावर्षी भावाच्या गावाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.