गडचिरोली : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा तेथे आधीच उभ्या असलेल्या वयस्कर व्यक्तीने स्कार्फ खेचून विनयभंग केला. ही घटना २७ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली. याबाबत अहेरी ठाण्यात दुपारी गुन्हा नोंद झाला.
पीडित १९ वर्षीय विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, ती २७ जून रोजी सकाळी अहेरीतील उपजिल्हा रुग्णालय रोडवरील जिल्हा मध्यर्वती सहकारी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती. तेथे आधीच ५० वर्षीय व्यक्ती उभा होता. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तसेच पीडितेचा एक हात पकडून त्याने दुसऱ्या हाताने स्कार्फ खेचला, त्यानंतर असभ्य वर्तन केले. रंगाने काळा, उंची अंदाजे साडेपाच फूट, डोळ्यावर चष्मा व जाड तसेच अंगात पांढरा शर्ट व निळसर पँट असा त्याचा पेहराव होता, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अज्ञात आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपनिरीक्षक करिश्मा मोरे तपास करत आहेत. फुटेजवरुन तपास
एटीएममध्ये नेमके काय घडले, हे जाणून घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील. त्यानुसार कारवाईची दिशा ठरवली जाईल.
- किशोर मानभाव, पोलिस निरीक्षक अहेरी ठाणे