रमेश मारगोनवार
भामरागड (जि.गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यात पुलाच्या कामावरील तीन वाहने जाळल्याची घटना ताजी असतानाच नक्षलवाद्यांनी धूळवडीला गावी गेलेल्या एका विद्यार्थ्याला गोळीचा निशाणा बनवले. राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने भामरागड हादरले आहे.
साईनाथ चौतू नरोटी (२६,रा.मरदूर ता.भामरागड) असे मयताचे नाव आहे. तो गडचिरोली येथे पदवीच्या प्रथम वर्षात शिकत होता. होळी व धूलिवंदन सणासाठी गावी गेला होता. ९ मार्च रोजी तो पुन्हा गडचिरोली येथे परतणार होता, परंतु त्यापूर्वीच नक्षल्यांनी त्याला लक्ष्य केले. दुपारी २ वाजता कामानिमित्त तो आई- वडिलांसह शेतात गेला होता. दुपारी ४ वाजता शेतातून परतताना मरदूर- कत्रनगट रस्त्यावर नक्षल्यांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली.
नारगुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. १० मार्च रोजी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नजीकच्या रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, तो पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने किंवा पोलिस भरतीत सहभागी झाल्याच्या रागातून त्यास संपविले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत पोलिस अधीक्षक नीलोत्पल व अपर अधीक्षक अनुज तारे यांना संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही.
महासंचालकांच्या दौऱ्यावर सावट
मेळाव्यानिमित्त १० मार्च रोजी पोलिस महासंचालक रजनीश सेठ, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील हे गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे येत आहेत. नक्षल्यांनी पूर्वसंध्येला विद्यार्थ्याची हत्या केल्याने या दौऱ्यावर या घटनेचे सावट निर्माण झाले आहे.