कुरूड जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतची शाळा आहे. या शाळेमध्ये इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमाची एकूण विद्यार्थी पटसंख्या ३०२ एवढी आहे. इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमाच्या दोन वर्ग तुकड्यांत विभागणी केली आहे. दोन तुकड्यांमध्ये विभागणी तर केली आहे, परंतु शाळेमध्ये वर्ग भरविण्याकरिता पुरेशी जागा नाही. एकाच इमारतीतील सहा खोल्यांमध्ये इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमाचे विद्यार्थी एकत्रच बसविल्या जात आहेत.
देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी शाळा म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल ओळखली जाते. याठिकाणी दहावीचे परीक्षा केंद्रसुद्धा असते. आजूबाजूच्या शाळेतील विद्यार्थी दहावीची परीक्षा देण्याकरिताही याच शाळेमध्ये येत असतात. तरीसुद्धा जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नवीन इमारत बांधण्याकडे शासनाचे दुर्लक्ष हाेत आहे, असा आराेप पालकांनी केला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता दिवसेंदिवस वाढतच आहे. शाळेतील इमारतींच्या कमतरतेमुळे बारा तुकड्यांतील विद्यार्थी एकत्रच बसतात. येथे शारीरिक अंतर वा कोरोनासंबंधित नियम कसे काय पाळणार? असा सवालही उपस्थित होतो. त्यासाठी इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना नवीन इमारत बांधून द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
बाॅक्स
वाचनालयात स्टाफरूम
कुरूड जि.प. हायस्कूलमध्ये नवीन इमारत मंजूर आहे. इमारतीचे बांधकाम काही प्रमाणात झाले आहे. काही बांधकाम निधीअभावी ठप्प आहे. शासनस्तरावरून जोपर्यंत निधी उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत हे असेच चित्र राहणार आहे. शाळेतील कर्मचारी स्टाफचीही अवस्था बिकट आहे. इमारतीच्या कमतरतेमुळे जिथे वाचनालय आहे, त्याठिकाणी कर्मचाऱ्यांना बसावे लागत आहे, असे मुख्याध्यापिका पराते यांनी सांगितले.