आष्टी (गडचिरोली) : अहेरी आगाराच्या सकाळी जाणाऱ्या बसेस वेळेवर येत नाही. त्यासाठी चौडमपल्ली येथून आष्टीला येणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांनी बसेस अडवून एसटी महामंडळ प्रति रोष व्यक्त केला. एक तास वाहतूक ठप्प झाली होती. आष्टीचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी घटनास्थळी जाऊन याबाबत आगार व्यवस्थापक यांचेशी चर्चा केली. त्यानंतर बसेस सोडण्यात आल्या.
आलापल्ली ते आष्टी हा मार्ग पूर्णपणे उखडला असल्याने अहेरी आगाराच्या बसेस वेळेवर पोहचत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जायला उशीर होतो. रोज विद्यार्थी चौडमपल्ली येथून आष्टीला शाळेत येण्यासाठी बसस्टॉपवर उभे असतात. तासनतास वाट पाहूनही बस वेळेवर येत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक चिडून गेले. शेवटी गुरूवारी शाळेचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि बसेस अडवून धरल्या. जवळपास एक तास वाहतूक खोळंबली. बसेस व ट्रकची रांग लागलेली होती. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे हे घटनास्थळी पोहचले व परिस्थितीची माहिती घेऊन तत्काळ आगार व्यवस्थापक यांचेशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी व पालकांशी चर्चा करुन बसेस सोडण्यात आल्या.
रस्त्यासाठी रास्ता रोको
देसाईगंज नगरपरिषद क्षेत्रातील भगतसिंग वाॅर्डातून नैनपूरला जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यातच या मार्गालगत राईस मिल आणि काही इतर व्यावसायिक रस्त्यावरच व्यवसायाचे बिऱ्हाड मांडत असल्याने रस्त्याची ऐसीतैशी झाली आहे. रस्त्यावर पडलेले अतिशय खोल खड्डे आणि रस्त्यावर उभी राहणारी जड वाहने यामुळे त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी रास्ता रोको आंदोलन करून या समस्येकडे लक्ष वेधले.
देसाईगंज नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या नैनपूर गावाला जाण्यासाठी एकच मार्ग आहे. याच मार्गावर तिरुपती राईस मिल आहे. याच परिसरात शहरातील बहुतांश मिल आहेत. त्यामुळे या भागात नेहमीच जड वाहनांची दिवसभर वर्दळ सुरू असते. या वाहनांमुळे मोठे खड्डे पडून मुलांसह नागरिकांचे अपघात होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ताबडतोब रस्ता दुरुस्त करण्यात यावा, रस्त्यावर वाहनांची पार्किंग न करता पर्यायी सोय करण्यात यावी यासाठी नगरपरिषदेला निवेदन दिले. निवेदनावर विद्यार्थी, पालक, नागरिक यांच्या सह्या आहेत.