लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : मागील चार महिन्यांपासून एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस सेवा बंद आहे. शालेय विद्यार्थ्यांकरिता असलेली मानव विकास मिशनची बस सेवा बंद आहे. मानव विकास मिशनची बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी, या मागणीकरिता शुक्रवारी विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी बसस्थानकात धडक देत बससेवा सुरू करा, अशा घोषणा दिल्या व निवेदन सादर केले.शासनाच्या मानव विकास मिशन योजनेंतर्गत बस सेवेचा लाभ येथील शेकडो विद्यार्थांना होत होता. ग्रामीण भागातून तालुका मुख्यालयात असलेल्या शाळा, महाविद्यालयात मानव विकास मिशनच्या बसच्या माध्यमातून विद्यार्थी जात हाेते. आता बस बंद असल्याने प्रवास अडचणीचा झाला आहे. विद्यार्थांनी मानव विकासच्या बस फेऱ्या सुरू करा, अशा घोषणा दिल्या. बसस्थानक प्रतिनिधी कुमरे यांच्याकडे निवेदन दिले. याप्रसंगी प्रा. नागेश फाये, श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. डब्लू. बडवाईक, शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. एम. गेडाम, विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र अलगदेवे, स्वर्णदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल नूतीलकंठावार आदी उपस्थित होते.