लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : २६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले असल्याने शाळेत जाण्यासाठी बाहेर गावावरील विद्यार्थ्यांची धावपळ वाढली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या बस पासेससाठी आष्टी भागातील विद्यार्थ्यांना अहेरीच्या आगारात जाऊन पासेस घ्यावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या आष्टी येथील बसस्थानकावर एक कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत होते. यापूर्वी आष्टी येथूनच विद्यार्थिनींना बस पासेस मिळत होते. मात्र अहेरीच्या आगार प्रमुखाने आष्टीच्या त्या एकमेव कर्मचाºयाला अहेरीच्या आगारात बोलावून घेतले. त्यामुळे आता आष्टी भागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांना बस पासेससाठी धावपळ करावी लागत आहे.अहेरी डेपोमधील कर्मचारी देवराव ढवस हे गेल्या तीन वर्षांपासून आष्टी येथील बसस्थानकामध्ये कार्यरत आहे. या मार्गाने जाणाºया प्रत्येक बसची नोंद करणे, विद्यार्थ्यांच्या पासेस काढणे, कर्मचाºयांना त्रैमासिक, मासिक तसेच वार्षिक पास देणे आदी काम ते आष्टी येथून करीत होते. त्यामुळे यापूर्वी या भागातील विद्यार्थ्यांना स्थानिकस्तरावर पासेस मिळत होत्या. कर्मचाºयांनाही पासेसची सुविधा मिळत होती. यातून एसटी महामंडळाला वार्षिक २० लाख रुपयांचा नफा मिळत होता. मात्र गेल्या पाच दिवसांपूर्वीपासून अहेरीच्या आगार प्रमुखांनी सदर कर्मचाºयाला अहेरी आगारात बोलावून घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पासेस काढण्यासाठी आता अहेरीला जावे लागत आहे.२६ जूनपासून शाळा सुरू झाल्यापासून आष्टी भागातील मोठ्या गावांमध्ये असलेल्या शाळांमध्ये लगतच्या गावातील विद्यार्थी शिक्षण घेतात. बहुतांश विद्यार्थ्यांच्या गावी शाळा नसल्याने दुसºया गावच्या शाळेत ये-जा करून शिक्षण घ्यावे लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना बस पासेसची गरज पडते. मात्र बस पासेसची व्यवस्था या वर्षी स्थानिक स्तरावर ठेवण्यात आली नाही. आष्टी भागातील काही विद्यार्थी बस पासेस काढण्यासाठी गडचिरोलीला गेले असता, त्यांना आष्टीलाच पासेस काढा असे सांगून महामंडळाच्या वतीने परत पाठविण्यात आले. एसटीची पास कोणत्याही डेपोतून काढून देणे गरजेचे आहे. परंतु ज्या भागातील विद्यार्थी असेल, त्याच भागातून पासेस काढा, असे एसटी कर्मचारी सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बस पासेससाठी हेलपाटे मारावे लागत आहे.सरकारने एकेकीकडे विद्यार्थ्यांसाठी बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मोफत पासेस दिल्या जातात. मात्र या पासेससाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागत आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणाच्या कामात लागले आहेत. दरम्यान शाळा बुडू नये, यासाठी बाहेर गावातील विद्यार्थी महामंडळाच्या स्थानिक कार्यालयात जाऊन बस पासेससाठी अर्ज करीत आहेत. मात्र सदर कामात दिरंगाई केल्या जात असल्याने बºयाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.मानव विकास मिशनच्या बसेस सुरू झाल्याच नाहीशाळा सुरू होऊन चार दिवस उलटले. मात्र अद्यापही मानव विकास मिशनच्या बसगाड्या मार्गावर सुरू करण्यात आल्या नाही. मानव विकास मिशनच्या बसफेºयांचे नियोजन एसटी महामंडळाने शाळा सुरू होण्यापूर्वी करायला पाहिजे होते. मात्र नियोजन ढासळल्याने याचा फटका बाहेर गावाहून शाळेच्या ठिकाणी ये-जा करणाºया शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींना बसत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय व आगाराच्या कार्यालयाला पत्र देऊन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बसगाड्या सुरू कराव्या, अशी मागणी आष्टी परिसरातील पालकांसह विद्यार्थ्यांनी केली आहे. बस पासेससाठी गडचिरोली आगार, आरमोरी, देसाईगंज या ठिकाणच्या बसस्थानक कार्यालयात विद्यार्थ्यांची दिवसभर गर्दी दिसून येत आहे. सदर कामाचा वेग वाढविण्याची मागणी आहे.
बस पासेससाठी विद्यार्थ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:05 PM
२६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले असल्याने शाळेत जाण्यासाठी बाहेर गावावरील विद्यार्थ्यांची धावपळ वाढली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या बस पासेससाठी आष्टी भागातील विद्यार्थ्यांना अहेरीच्या आगारात जाऊन पासेस घ्यावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत आहे.
ठळक मुद्देएसटीच्या कर्मचाऱ्याला अहेरीत बोलावले : आष्टी भागातील विद्यार्थ्यांची अडचण