कुलगुरूंचे आवाहन : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा समारोपगडचिरोली : जिल्ह्यातील तालुका व जिल्हास्तरावरील विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संशोधन कार्याकडे वळावे व या कार्यात सातत्य ठेवावे, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समावेशित विकासासाठी विज्ञान व गणित’ या विषयावर जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (माध्य.) नानाजी आत्राम तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) विजय मुळीक, प्रा. धनजंय चापले, उपशिक्षणाधिकारी निकम, प्राचार्य कुमरे, विज्ञान पर्यवेक्षक विराज खराटे उपस्थित होते.विद्यार्थ्यामध्ये संशोधनवृत्ती निर्माण करण्यासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या गुणांना वाव देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होईल. यासााठी विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. कल्याणकर यांनी केले. शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम यांनी विज्ञान प्रदर्शनातून चांगले वैज्ञानिक निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. संचालन स्मिता लडके व राकेश चडगुलवार यांनी तर आभार निकम यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)उत्कृष्ट प्रतिकृतीबद्दल यांचा झाला गौरवया विज्ञान प्रदर्शनित १३५ पैकी १०४ प्रतिकृती सादर करण्यात आल्या होत्या. यापैकी उत्कृष्ट प्रतिकृती सादर केलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यात गैरआदिवासी माध्यमिक गटात अजय चकीनारपवार, शिक्षक ई. एच. टेकाम, चेतन बाळराजे, शिक्षक संतोष भोयर, महेश मेनेवार, शिक्षक एस. आर. धोंगडे, माध्यमिक आदिवासी गटात अजय झोडे, शिक्षक आर. खोब्रागडे, माध्यमिक शैक्षणिक साहित्य (शिक्षक) एन. टी. साठवने, माध्यमिक लोकसंख्या शिक्षण (शिक्षक) एस. डी. सरकार, प्रयोगशाळा सहायक परिचर नरेंद्र उंदीरवाडे तर प्राथमिक गैरआदिवासी गटात फरीन शेख, शिक्षक मोरेश्वर खुणे, यशोधरा प्रधान, शिक्षक बी. डी. बोळणे, गायत्री सोनटक्के, शिक्षक डी. एल. राठोड, प्राथमिक आदिवासी गटात सुरज गावतुरे, शिक्षक अरविंद उरकूडे, प्राथमिक शैक्षणिक साहित्य गट (शिक्षक) एस. बी. कोंकमुट्टीवार, प्राथमिक लोकसंख्या शिक्षण गट (शिक्षक) अशोक बोरकुटे, याशिवाय प्रश्नमंजुषा स्पर्धेत केतन देशमुख, रोहित रामटेके, गायत्री सोनटक्के, अभिमन्यू नव्हाते, सुजीत चेडे तर वक्तृत्व स्पर्धेत अजय चकीनारपवार, अभिषेक तिवारी, सतीश येलमुले, रोहित तामशेट्टीवार यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनो, संशोधन कार्याकडे वळा
By admin | Published: January 07, 2016 1:57 AM