गडचिरोली : लिलाव झालेल्या रेतीघाटावरून रेतीची वाहतूक करताना नियमांना बगल देत अनधिकृतपणे रेती वाहून नेण्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नवेगाव मार्गावर चार ट्रक रेती पकडली. ते चारही ट्रक जप्त करण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, एसडीओ येरेकर नेहमीप्रमाणे व्यायाम शनिवारी सकाळी व्यायाम करण्यासाठी नवेगाव मार्गावर गेले असताना रेतीने भरलेले ट्रक येताना त्यांना दिसले. त्यांनी ट्रक थांबवून टीपीची पाहणी केली असता त्यात तारखेत खोडताड केली होती. दि.१२ च्या टिपीवरील तारीख पेनने बदलून त्यावर दि.१३ केले होते. अशा पद्धतीने टीपीवर खोडताड करता येत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा प्रकार असल्याचे लक्षात येताच येरेकर यांनी आपल्या यंत्रणेला कळवून ते ट्रक जप्त करण्यास सांगितले. जप्त केलेल्या चार ट्रकमधून एकूण ९ ब्रास रेती वाहतूक सुरू होती. त्यापैकी मल्लीक बुधवानी यांच्या २ ट्रकमध्ये ५ ब्रास रेती, अंकलेश गद्देवार यांच्या एका ट्रकमधून २ ब्रास तर व्याहाड (खु) येथील कवेंद्र पत्रुजी रोहनकर यांच्या एका ट्रकमध्ये २ ब्रास रेती होती.
याप्रकरणी पुढील चौकशी करण्यासाठी त्यांनी नायब तहसीलदार हेमंत मोहरे यांना निर्देश दिले. त्यांनी पंचनामा करत ट्रक जप्त केले असून संबंधित ट्रक मालकांचा जबाब घेतल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.