लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : माेबाइल टाॅवरची रेंत कमी राहत असल्याने नागरिकांना दोन-तीनदा फोन करूनही संपर्क होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन नवीन टॉवरची निर्मिती करावी. नवीन टाॅवरसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, निधीसाठी आपण पाठपुरावा करू, असे आवाहन खासदार अशाेक नेते यांनी केले. भारत संचार निगम लिमिटेडच्या वतीने आयोजित जिल्हा दूरसंचार सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती गडचिरोलीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागाच्या विश्रामगृहात पार पडली. बैठकीला दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य तथा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, समितीचे सदस्य सदानंद कुथे, सदस्य डॉ. भारत खटी, महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य रेखाताई डोळस, जिल्हा दूरसंचार अधिकारी खंडेलवाल, बीएसएनएलचे अधिकारी किशोर कापगते, गोन्नाडे व दूरसंचार विभागाचे सर्व तालुक्याचे जेटीओ, अधिकारी व तंत्रज्ञ उपस्थित होते.यावेळी अधिकाऱ्यांना निर्देश देताना खासदार अशोक नेते म्हणाले, जिल्ह्याच्या अनेक भागात रेंज राहत नसल्याने जिल्ह्यातील टॉवरचे सर्वेक्षण करून आवश्यक त्याठिकाणी टॉवर मंजूर करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. तसेच सर्व ग्रामपंचायतींना डिजिटल करून त्यांना इंटरनेट सेवेने जोडण्याच्या सूचनाही यावेळी खासदार अशोक नेते यांनी केल्या. कव्हरेज राहत नसलेल्या ठिकाणी व दुर्गम तालुक्यात मायक्रो बीटीएस सुविधा लावून नागरिकांना योग्य सेवा देण्याचे निर्देशही यावेळी खासदारांनी दिले. या आढावा बैठकीत इतर समितीच्या सदस्यांनी विविध विषय मांडले व त्यावर चर्चा करण्यात आली.
बीएसएनएलची फाेर-जी सेवा सुरू कराजिल्ह्यात बीएसएनएलची फाेर-जी सेवा सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करावा. खासगी कंपन्या अतिरिक्त रेंज ठेवत असल्याने रेडिएशन वाढत आहे. त्यामुळे पशु-पक्षी यांना धोका होत असून, मानवी जीवनातही काही दुष्परिणाम जाणवत आहे. त्याचावर नियंत्रण आणण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिल्या.