लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथील आरोग्य पथकाला राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा दिला आहे. तब्बल १२ वर्षाच्या पाठपुराव्याला यश आले असून याबाबत ३ सप्टेंबर २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.यापूर्वी पुराडा आरोग्य पथकाचा समावेश तालुक्यातील देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत करण्यात आला होता. मात्र देऊळगावचे अंतर पुराडा परिसरातून ३० ते ४० किमी असल्याने नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता.
पुराडा परिसरातील नागरिक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी पुराडा आरोग्य पथकाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी लावून धरली. सन २००८ पासून सामुहिक प्रयत्न व पाठपुरावा सुरू होता. तत्कालीन जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, जि.प.चे माजी सदस्य प्रभाकर तुलावी, पुराडाचे माजी उपसरपंच हरीश्चंद्र डोंगरवार व इतर पदाधिकाºयांनी ग्रामसभेत प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्याबाबतचा ठराव घेतला. हा ठराव पंचायत समितीला पाठवून मासिक सभेचा ठराव घेण्यात आला.
या ठरावावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा घडवून आणण्यात आली. त्यानंतर जि.प. आरोग्य समितीने प्राथमिक आरोग्य केंद्र निर्मितीचा ठराव घेऊन राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला. त्यानंतरही राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर राज्य शासनाने नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन पुराडाच्या आरोग्य पथकाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा प्रदान केला आहे. त्यामुळे पुराडा परिसरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. परिसरातील १५ ते २० गावातील नागरिकांना नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात आणखी काही नव्या आरोग्य केंद्राचा प्रस्ताव थंडबस्त्यात आहे.कर्मचारी निवासस्थानाची सोय नाहीप्राथमिक आरोग्य केंद्र आज ना उद्या निर्माण होईल या दृष्टीकोनातून आरोग्य विभागाच्या वतीने येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वीच निवासस्थानाचे बांधकाम करण्यात आले. फिरत्या आरोग्य पथकाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळाला असून येथे नव्याने निर्माण होणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पद निर्मितीबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल, असे ३ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णया नमूद आहे. कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात ग्रामीण भागातून दररोज बरेच रूग्ण रेफर केले जातात. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील आरोग्य सेवा बळकट केल्यास स्थानिक नागरिकांना सोयीचे होणार आहे.