लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: वैनगंगा नदीत डोंगा उलटून तीन मुलींना मिळालेल्या जलसमाधीच्या दुर्घटनेनंतर हा डोंगा चालवणाऱ्या नावाड्याचा मृतदेह अद्यापी हाती लागलेला नाही. तो या मुलींचा काका असल्याने त्याने आत्महत्या केली असावी अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे. चामोर्शी तालुक्यात असलेल्या वाघोली या गावात मंगळवारी या तीन मुलींचा पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाला होता. मृत मुलींमध्ये सोनी मूकरू शेंडे, समृध्दी ढिवरु शेंडे (रा.वाघोली) या चुलत बहिणी आणि पल्लवी रमेश भोयर (रा.येवली) या त्यांचा आत्येबहिणीचा समावेश आहे. तिघीही 12 ते 14 वर्ष वयोगटातील आहेत. यातील सोनी ही विश्वशांती विद्यालय भेंडाळा येथील विद्यार्थिनी असून ती यावर्षी आठव्या वर्गात होती.
या तिघी मुली डोंग्याने वैनगंगा नदीच्या पैलतीरावर चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या आमराईत आंबे आणण्यासाठी जात होत्या. पण खोल पाण्यात त्यांचा डोंगा उलटल्याचे सांगितले जाते.