लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यार्थ्यांना शाळा व अभ्यासाविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईने पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुरक वाचन पुस्तके तयार केले आहे. सदर पुस्तके गडचिरोली जिल्ह्यातील शाळांना उपलब्ध करून दिली जात आहेत.प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रम रटाळ वाटतो. बरेचसे विद्यार्थी नियमित अभ्यास करीत नाही. त्यामुळे ते वाचन व लेखन क्षमतेच्या मागे पडतात. विद्यार्थ्यांना कथा, कादंबºया, गोष्टी, कोडे, व्यंगचित्र आदींच्या माध्यमातून वाचन व लेखनाची सवय लागावी, या उद्देशाने प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईने लहान-लहान पुस्तके तयार केली आहेत. सदर पुस्तके विद्यार्थी संख्येनुसार शाळांना वितरित केली जाणार आहेत. ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचल्यानंतर ही पुस्तके शाळेमध्येच ठेवायची आहेत. त्यामुळे ग्रंथालयाप्रमाणे या पुस्तकांचा वापर विद्यार्थ्यांना होणार आहे. विशेष करून ज्या शाळांचे विद्यार्थी लेखन व वाचनात मागे आहेत, अशा शाळांना पुस्तके वितरित करताना प्राधान्य दिले जाणार आहे. सद्य:स्थितीत गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ही पुस्तके उपलब्ध झाली आहेत. पुस्तकांच्या प्रकाराप्रमाणे त्यांची विभागणी करण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या आठ दिवसात सदर पुस्तके शाळांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.विद्यार्थ्यांची वाचन व लेखन क्षमता वाढावी, यासाठी शिक्षण विभाग, विद्या प्राधिकरण, प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या वतीने अनेक उपाय योजले जात आहेत. मात्र विद्यार्थ्यांची क्षमता पाहिजे त्या प्रमाणात विकसित होत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
पुरक वाचन पुस्तके उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 1:24 AM
विद्यार्थ्यांना शाळा व अभ्यासाविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईने पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुरक वाचन पुस्तके तयार केले आहे.
ठळक मुद्देजि.प. शाळांना लाभ : कथा, कादंबऱ्या, गोष्टी, व्यंगचित्र, कोडे आदींचा समावेश